काटे उलटे फिरायला लागलेत!

गजेंद्र उंबरकर या तरुणाचं थप्पडमार प्रकरण अमरावतीचे आमदार रावसाहेब शेखावत यांच्या अंगलट आलं आहे. या प्रकरणात पहिल्या दिवशी त्यांना जी सहानुभूती होती ती मागे पडून आता तेच कॉर्नर झाल्याचे दिसत आहे. पक्षातले-पक्षाबाहेरचे सारेच त्यांच्या विरोधी सूर आळवताहेत. विलास इंगोले, वसंतराव साऊरकर, बबलू शेखावत हे म्हणायला सोबत आहेत. पण आतून ते सुद्धा नाराज आहेत. रावसाहेब ऐकत नाही, आपल्याचं मनाने करतात, राजकारणातलं ज्यांना काहीच कळत नाही, जनतेसोबत ज्यांचा दूरपर्यंत संबंध नाही अशा स्वीय सचिवांच्या सल्ल्याने ते निर्णय घेतात, ही सार्वत्रिक तक्रार आहे. रावसाहेबांना हे पटतंय की नाही, माहीत नाही. पण रावसाहेब एकटे पडत आहे, हे खरं आहे. २00९ च्या निवडणुकीत ज्यांनी ज्यांनी त्यांना साथ दिली त्यांच्यापैकी काहींचा अपवाद वगळता बहुतांश मंडळी त्यांच्या विरोधात गेली आहेत. त्या निवडणुकीत शहर काँग्रेसची धुरा सांभाळणारे विश्‍वासराव देशमुख यांनी या आठवड्यात रावसाहेबांवर तोफ डागली. शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन अचानक दूर गेल्याची सारी भडास बाहेर काढतांना आगामी निवडणुकीत रावसाहेबांना काँग्रेस तिकीट देणार नाही, असा खळबळजनक दावाही विश्‍वासरावांनी करुन टाकला. हा दावा किती गंभीरतेने घ्यायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. 


रावसाहेबांनी विश्‍वासरावांची ‘ज्योतिषी’ या शब्दात संभावना करुन त्यांचा दावा उडवून लावला. तर्काने विचार केला, तर रावसाहेबांचं तिकीट कटेल, असं वाटत नाही. मात्र काँग्रेसमध्ये आणि हिंदी सिनेमात लॉजिक चालत नाही. येथे केव्हाही, कधीही, काहीही होऊ शकते. गेल्या निवडणुकीत मंत्री असलेल्या सुनील देशमुखांचं तिकीट कटेल, असं वाटलं होत का? पण तसं झालं. सुनील देशमुख गेली चार वर्ष बेकार बसून आहेत. त्यामुळे रावसाहेबांचं तिकीट कटणारच नाही, असंही नाही. तसंही रावसाहेबांचं नेतृत्व हे नैसर्गिक नेतृत्व नाही. चार वर्षापूर्वी राष्ट्रपती भवनाच्या सहाय्याने अमरावतीत त्यांचं रोपण करण्यात आलं होतं. काही असंतुष्ट आत्म्यांनी सुनील देशमुखांना धडा शिकविण्यासाठी जबरदस्तीचं हे माळीकाम केलं होतं. रोपणं केलेल्या झाडाचं कसं असतं… काही झाडं दुसर्‍या ठिकाणीही तरारून जोम धरतात. फुलतात, फळतात. काही मात्र माना टाकतात. जोपर्यंत राष्ट्रपती भवनात प्रतिभाताई बसल्या होत्या, तोपर्यंत रावसाहेबांचं झाड फुलल्यासारख, बहरल्यासारख वाटायचं. मात्र ताई पदावरुन दूर झाल्या आणि रावसाहेबांच्या मर्यादा  स्पष्टपणे जाणवायला लागल्यात. त्यांचं झाडंही सुकायला लागलं. चार वर्ष झाडावर जमा झालेले कार्यकर्तारुपी पक्षीही नजरेसमोर उडायला लागलेत. कार्यकर्त्यांइतकी धूर्त जमात दुसरी नसते. त्यांना बदललेले वारे हवामान खात्यापेक्षाही लवकर लक्षात येतात. त्यात प्रतिभाताईंच्या राष्ट्रपतीपदाच्या कारकिर्दीत त्यांच्या वाटयाला काहीच न आल्याने त्यांची नाराजी मोठी आहे. अशा परिस्थितीत रावसाहेबांसाठी समोरची वाटचाल सोपी नाही, हे नक्की.

अशा परिस्थितीचा विरोधक फायदा न घेतील, तरच नवल. अमरावतीचा आमदार होण्याचे वेध लागलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पप्पू पाटील यांनी २00९ ची निवडणूक रावसाहेबांनी तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेशकुमार व पोलीस दलाच्या मदतीने जिंकली, असा आरोप केला आहे. पप्पू पाटलांची विश्‍वसनीयता शून्य आहे. त्यांच्या इंटिग्रिटीबद्दलही काही चांगलं बोलावं असं नाही. मात्र ते बर्‍याच अंशी खरं बोलले आहेत. मागची निवडणूक ही रावसाहेबांनी लढविलीच नव्हती. राष्ट्रपती भवन व भारत सरकार त्यांच्यावतीने येथे निवडणूक लढवित होतं. काय-काय प्रकार झाले नाही त्या निवडणुकीत? देशभरातून पाण्यासारखा पैसा आला. सर्व धर्माच्या-सर्व समाजाच्या अखिल भारतीय नेत्यांनी अमरावतीत बस्तान ठोकलं होतं. सार्‍या मीडियाची-पत्रकारांची नसबंदी करण्यात आली होती. (तेव्हा नसबंदी झालेले आता पुन्हा टाके उसवून तटस्थ असल्याचा आव आणताहेत) पोलीसांसह सारी शासकीय यंत्रणा देवीसदनच्या इशार्‍यावर नाचत होती. by hook & by crook  कोणत्याही परिस्थितीत रावसाहेबांना निवडून आणायचं, एवढेच आदेश तेव्हा होते. विषय रावसाहेबांचा नव्हताच, राष्ट्रपती भवन व काँग्रेसच्या नेतृत्वाची इज्जत पणाला लागली होती. त्यामुळे त्या निवडणुकीत रावसाहेब निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेघ होती. रावसाहेबांच्या गोटातील कॉन्फिडन्स एवढा तगडा होता की, कोणत्या राऊंडपर्यंत सुनील देशमुख आघाडीवर राहिलं, कुठून रावसाहेब आघाडी घेतील , कोणत्या बुथवर त्यांना किती मते मिळतील, याचा छातीठोक दावा करणारे महाभाग त्यांच्याजवळ होते. शेवटी ते खरेही ठरले. (ती निवडणूक आणि त्यातील किस्से हा स्वतंत्र पुस्तकाचा विषय आहे.) चमकून जाण्याचं काही कारण नाही. आपल्याकडील व्यवस्थेत हे असंच घडतं. आपण मात्र जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असे गोडवे गात असतो. मात्र आता मधल्या काळात भरपूर पाणी वाहून गेलं आहे. रावसाहेबांना ताकद देणारी ती कवचकुंडल आता उरली नाहीत. त्यामुळे स्वाभाविकच चारवर्षापूर्वी होती ती शक्तीही निघून गेली आहे. (त्यामुळेच एवढं महाभारत घडूनही पोलीस आयुक्तांची बदली करण्यास ते असर्मथ ठरत आहे.) याचा अर्थ रावसाहेबांसाठी सारंच प्रतिकूल आहे, असं नाही. काँग्रेसची तिकीट मिळविण्यात जर ते पुन्हा यशस्वी ठरलेत, तर त्यांची विजयाची शक्यता तगडी राहिल यात वादच नाही. मात्र येत्या वर्षभरात त्यांना भरपूर रिपेअरिंग वर्क करावं लागणार आहे. नाराजांना राजी करावं लागेल, दूर गेलेल्यांना जवळ आणावं लागेल. सत्तेतून मिळणार्‍या मलिद्यात इतरांनाही वाटा द्यावा लागेल. सर्वात महत्वाचं म्हणजे शहराची गेलेली रया परत आणावी लागेल. हे सगळं ते करु शकले, तर त्यांना पुढे भवितव्य आहे. नाहीतर ‘एक होते रावसाहेब….’ ही कथाच तेवढी मागे उरेल.

                                                डॉक्टरांनो, आणखी किती जीव घेणार?

डॉ. सावदेकर हॉस्पिटलमधील प्रकरणाची शाई वाळते न वाळते तोच डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा अत्यंत संतापजनक प्रकार तखतमल हॉस्पिटलमध्ये घडलाय. डॉक्टरांच्या सार्‍या संवेदना गोठून गेल्यात की काय असे वाटावं इतका निर्घृण तो प्रकार होता. घरात येणार्‍या पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी सारं कुटुंब आतुर झालं असतांना डॉक्टरांच्या नालायकीने आई आणि बाळाचा मृत्यू पाहावा लागण्याइतकी दुसरी मरणप्राय वेदना नाही. डॉक्टरांवरील सारा विश्‍वासच उडावा असा हा सारा प्रकार आहे. माणसांच्या जीवाबाबत डॉक्टर एवढे बेफिकीर होऊच कसे शकतात? एक पती प्रसववेदनेने तडफडत असलेल्या आपल्या पत्नीची हालत पाहून जीवाच्या आकांताने डॉक्टरांना साद घालतो. ते मात्र त्याकडे दुर्लक्ष करतात. हॉरिबल आहे हे सारं. अमरावतीच्या डॉक्टरांनो, आपलं वागणं बदला. लोकांची सहनशक्ती आता संपली आहे. संतापानं ते धगधगत आहे. हे असंच सुरु राहिलं, दररोज तुम्ही मार खाल, हॉस्पिटलची रोज तोडफोड होईल आणि त्याला जबाबदार केवळ आणि केवळ तुम्हीच असाल.


(लेखक दैनिक पुण्यनगरीचे कार्यकारी संपादक आहेत)

भ्रमणध्वनी-८८८८७४४७९६

उत्सवाच्या नावाखाली तमाशा खूप झाला!

‘धर्म ही अफूची गोळी आहे’, हे कार्ल मार्क्‍स खूप आधी सांगून गेलाय. अमरावतीच्या विद्यमान नेत्यांना कार्ल मार्क्‍स वा त्याचं हे वाक्य माहीत असण्याची सुतराम शक्यता नाही. मात्र देवा-धर्माच्या नावाची अफूची गोळी जनतेला सार्‍या समस्यांचा विसर पाडते हे त्यांना नक्कीच माहीत असल्याचं दिसते आहे. गेल्या काही दिवसात अमरावतीत उत्सवाच्या नावाखाली धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनाची जी चढाओढ लागली आहे, ती कुठल्याही सुजाण नागरिकाला हतप्रभ करणारी आहे. निराश करणारी आहे. देवासमोर बळी देणार्‍या प्राण्याला वेदना कमी व्हाव्यात म्हणून ज्याप्रमाणे दारु पाजली जाते, मादक पदार्थांचं सेवन करविलं जातं, त्याच पद्धतीने शहरातील कुठल्याही मुलभूत समस्यांकडे जाऊ नये यासाठी अमरावतीकरांना सद्या धार्मिक उत्सवात चिंब भिजविलं जात आहे. यात कोणीही मागे नाही. शिवसेना व भारतीय जनता पक्षाचा, तर हा धंदाच आहे. पण काँग्रेस वा राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा यात कुठेही मागे नाही.


 सारं अमरावती शहर खड्डयांनी भरलं आहे. ‘अमरावती गेली खड्डयात’ म्हणण्याची पाळी आली आहे. कायदा व सुव्यवस्थेची पार ऐसीतैशी झाली आहे. आमदारांना सर्वांसमक्ष थापडा मारल्या जातात. चार वर्षापूर्वीची ‘स्वच्छ अमरावती, सुंदर अमरावती’ इतिहासजमा होऊन आता ‘गलिच्छ अमरावती, घाणेरडी अमरावती’ असे नवीन स्लोगन देण्याची वेळ आली. शहराचं स्वास्थ सांभाळण्याची जबाबदारी असलेली महानगरपालिका खाऊंचा अड्डा बनली आहे. एवढा मोठा फायबर मुत्रीघर घोटाळा होऊनही कोणी तोंड उघडायला तयार नाही. सांस्कृतिक भवन घोटाळा, हायड्रोलिक ऑटोचं घबाडं, रहदारी पास प्रकरण असे असंख्य घोटाळे असतांना मनपा आयुक्त वाईटपण घ्यायला तयार नाही. चोरांच्या भांडणात विशेष अनुदान म्हणून आलेले २५ कोटी रुपये बँकेत सडत आहे. शहराचे दोन्ही आमदार केवळ वैयक्तिक मानपमानाचे खेळ रंगवित आहेत. अमरावतीच्या सार्‍या समस्यांना जणू पोलीस आयुक्तच जबाबदार आहे, असं त्यांचं वागणं आहे. बालीश वागण्याच्या या स्पर्धेत विरोधकही तेवढय़ाच हिरीरीने सहभागी आहेत. मनपाच्या सभेत आवाज उठविल्याचा आभास निर्माण करुन आपला ‘वाटा’ सुरक्षित ठेवण्यात त्यांना रस आहे. असा सारा आनंदीआनंद असतांना भागवत कथा, दहिहंडी उत्सव, गणेशोत्सव मात्र जोरात आहे.

अलीकडच्या काही वर्षात आपली राजकीय दुकानदारी कायम ठेवण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी धार्मिक उत्सवांचा वापर करणे सुरू केले आहे. वेगवेगळ्या उत्सवात भरपूर पैसा ओतून कार्यकर्ते व जनतेला त्यात गुंतवून ठेवायचं. विचार करायला त्यांना संधीच द्यायची नाही, यापद्धतीने सारं सुरु आहे. दुर्दैवाची गोष्ट सामान्य माणसांच्या ते लक्षात येत नाहीय. आपल्या वॉर्डातील रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले आहेत, त्याबाबत नगरसेवक वा आमदाराला जाब विचारायचं सोडून माणसं पुराणातल्या भाकडकथांवर माना डोलवायला जातात. सार्‍या शहराची वाट लागली असतांना दहिहांडीत डीजेच्या तालावर कंबर हलविण्यात युवापिढी मदरुमकी मानते. आता पुढचे १0-१२ दिवस गणेशोत्सवाच्या नावाखाली शहराला वेठीस धरलं जाईल. उत्सव हे आपल्या पूर्वजांनी अतिशय उदात्त हेतून आणले आहेत.

त्याचा संबंध भक्ती, श्रद्धा, आनंदासोबत आहे. भारतीय माणसाच्या जीवनातील या सुंदर प्रकाराचा राजकारण्यांनी मात्र त्यांच्या फायद्यासाठी ‘इव्हेंट’ करुन टाकलाय. दहिहांडीच्या उत्सवात सुमार नट-नट्या, नर्तिका आणून त्यांच्यावर लाखो रुपये उधळायचे, हजारो लिटर पाणी वाया घालवायचं याला उत्सव म्हणायचं का? गेल्या काही वर्षापासून प्रत्येक जन्माष्टमीला दहिहांडीच्या नावाखाली राजकमल, राजापेठ या शहरातील सर्वाधिक गजबललेल्या चौकातील वाहतूक बंद केली जाते. एकाचं पाहून दुसरा या स्पर्धेत उतरतो. यावर्षी शिवसेनेनं जयस्तंभ चौक बंद केला. कुठल्याही पोलीस अधिकार्‍यामध्ये हा तमाशा थांबविण्याची हिंमत नाही. आता गणेशोत्सवातही हे असेच प्रकार आणि पैशाचा चुराडा होणार आहे. गेल्या काही वर्षात अमरावतीत देशातील प्रसिद्ध मंदिरं व वास्तूंची प्रतिकृती उभारण्याचं फॅड आलंय. येथेही एकाच पाहून दुसर्‍यांनं त्याचं अनुकरण केलं. यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात. यासाठी आम्ही वर्गणी जमा करत नाही. वेगवेगळी प्रतिष्ठानं व भाविक स्वत:हून मदत करतात, अशी मखलाखी गणेश मंडळाचे कर्तेधर्ते करतात. पण ही अशी मदत योगायोगाने वा श्रद्धेने मिळत नाही. ती एक वेगळ्या प्रकारची दुकानदारीच असते. गणपती व मंडळाचं कसं मार्केटींग केलं जातं, लोकांच्या श्रद्धेचा फायदा घेऊन समाजातील मान्यवरांना महापूजेला कसं बसविलं जातं, गणपतीच्या मूर्तीसमोर काचेची दानपेटी लावून भक्तांना दान देण्यासाठी कसं उद्युक्त केलं जातं याच्या खूप सुरस कहाण्या आहेत. वेगळ्या अर्थाने हा धंदाच आहे. या अशा उत्सवात खरा भक्तिभाव कुठे दिसत नाही. भक्तांना, श्रद्धाळूंना मनापासून आनंद मिळेल, असंही काही दिसत नाही. राजकारणी व गुंडांनी आता व्यवस्थेसोबत देवाधर्माला वेठीस धरल्यावर दुसरं होणारं तरी काय? राजकारण्यांच्या या धंद्यात मेंढरासारखी गर्दी करून आपणही सामिल होतो, हे त्यातलं दु:ख.

(लेखक दैनिक पुण्यनगरीचे कार्यकारी संपादक आहेत)

भ्रमणध्वनी-८८८८७४४७९६

रावसाहेब, सावध व्हा!

अमरावतीचे आमदार रावसाहेब शेखावत यांचा लौकिक कारण नसतांना वाद निर्माण करण्यासाठी वा वादात पडण्यासाठी कधीच नव्हता. एक शांत आणि संयमित व्यक्तिमत्व अशीच त्यांची ख्याती आहे. असं असतानाही दोन अलग-अलग घटनांमुळे वेगळ्याच कारणांसाठी ते चर्चेत आले आहे. परवा दहिहांडीच्या कार्यक्रमात जो काही प्रकार घडला तो धक्कादायक, संतापजनकच होता. मात्र एका माथेफिरु तरुणाचा वेडेपणा एवढय़ा कारणमीमांसेवर हे प्रकरण सोडून देता येत नाही. रावसाहेबांनी या प्रकरणाबाबत ज्या शक्यता व्यक्त केल्या, त्याची निश्‍चितच तपासणी व्हायला हवी. ते म्हणतात त्याप्रमाणे त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांच्या चिथावणीवरुन हा प्रकार घडला असेल, तर ते अतिशय गंभीर आहे. ही शक्यता अजिबात नाकारता येत नाही. अमरावतीचं राजकारणाची पातळी सद्या ज्या पातळीवर घसरली आहे ते पाहता, रावसाहेब म्हणतात तसं घडलंच नसेल, असं म्हणता येत नाही. १५ दिवसांपूर्वी रावसाहेबांवर पिस्तूल रोखल्याचे आरोप व नंतर पोलीस तक्रार झाली होती. मात्र ते प्रकरण तक्रारकर्त्याच्याच अंगलट आल्याने विरोधकांनी हा दुसरा डाव तर रचला नाही, हे तपासायला हवं. 


अर्थात या प्रकरणाला आणखीही काही कंगोरे आहेत. आपल्याकडे नेत्याबद्दल निष्ठा दाखविण्यासाठी कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी करण्याचा प्रकार सामान्य असल्यामुळे त्या तरुणाची सविस्तर बाजू अजून समोर आली नाही. गेल्या दोन वर्षापासून गजेंद्र उंबरकर नावाचा तो तरुण रावसाहेबांचा निषेध करणारे स्लोगन लिहिलेले कपडे घालून महानगरपालिकेत व शहरात फिरत होता. रावसाहेबांच्या विद्याभारती महाविद्यालयाची डोनेशनची मागणी पूर्ण न करु शकल्याने आपलं आयुष्य बरबाद झालं, असं त्याचं म्हणणं होतं. याकडे लक्ष वेधण्यासाठी तो जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिकेत फिरत असे. वर्तमानपत्रांच्या कार्यालयांमधेही त्याने भरपूर चकरा मारल्या आहेत. पुण्यनगरी व काही वर्तमानपत्रांनी त्याचं म्हणणं, त्याची व्यथा याअगोदर प्रसिद्ध केली आहे. मात्र गेले पाच वर्ष रावसाहेबांकडे देशाची सर्वोच्च सत्ता नांदत असल्याने अधिकारी व बहुतांश माध्यमं त्यांच्यासमोर रांगण्यातच धन्यता मानत होते. त्यामुळे बहुतेक ठिकाणी गजेंद्रला वाटाण्याच्या अक्षताच लावण्यात आल्या होत्या. कुठेच न्याय मिळत नाही. कुठेच आपलं म्हणणं ऐकलं जात नाही यामुळे धुमसून त्याने परवाचं आततायी कृत्य केलं असेल, तर ते धोकादायक आहे. खरं तर राजकारणात कुठलीही गोष्ट कॅज्युअली घ्यायची नसते. गेली दोन वर्ष तो आपला निषेध नोंदवत असतांना, नाही रावसाहेब तर किमान रावसाहेबांचे शिलेदार म्हणविणार्‍यांनी हा प्रकार गंभीरतेने घ्यायला हवा होता. त्या तरुणाला भेटून त्याची समजूत काढायला हवी होती. त्याचं खरंच नुकसान झालं असेल, तर त्याची भरपाई करायला पाहिजे होती. पण कोणीही लक्ष दिलं नाही.

संतापाने धुमसणारी माणसं जीवावर उदार झाली असतात, ते काहीही करु शकतात, हे सर्वांनी कायम लक्षात ठेवायला हवं. गजेंद्रवर तो सांगतो तसा खरंच अन्याय झाला असेल, तर पोलीसांच्या तावडीतून बाहेर आल्यानंतर तो आणखी धोकादायक होईल, हे नक्की. पोलीसांकडून त्याच्यावर दडपशाही करणे हा सुद्धा इलाज नाही. रावसाहेबांनी त्याला बोलावून घेऊन त्याचं म्हणणं समजून घेतलं पाहिजे. शक्य असल्यास त्याचं समाधान केलं पाहिजे. परवाच्या प्रकरणाबाबत काँग्रेसचे पदाधिकारी पोलीस आयुक्तांविरुद्ध संताप व्यक्त करत आहेत. आयुक्त व्यासपीठावर असतांना असं घडलंच कसं, असा त्यांचा सवाल आहे. ज्या देशात शेकडो सुरक्षा रक्षकांच्या उपस्थितीत दोन पंतप्रधानांची हत्या व संसदेवर हल्ला होतो, तिथे काहीही होऊ शकते. याचा अर्थ पोलीस आयुक्तांचं काहीचं चुकलं नाही, असं नाही. या घटनाक्रमाचं जे व्हिडीओ फुटेज व फोटो उपलब्ध आहेत, त्यावरुन ते काहीसे उशीरा रिअँक्ट झाल्याचे लक्षात येते. पण अशा घटना इतक्या झटपट घडतात की, कृती करायचं भान काहीसं उशीरा येतं. ज्याक्षणी आयुक्तांना ते आलं त्यांनी परिस्थितीवर ताबा मिळविला. मात्र अजित पाटलांनी इफेक्टीव्ह पोलिसिंग कशाला म्हणतात हे जरा लक्षात घ्यायला हवं. सर्व प्रकारच्या शक्यता गृहित धरुन पोलीसांनी बंदोबस्त ठेवायचा असतो. पोलिस आयुक्तांनी सार्वजनिक कार्यक्रम जरा कमी करुन स्ट्रिक्ट पोलिसिंगकडे लक्ष दिले पाहिजे. यावर्षी दहिहांडीचे कार्यक्रम चौकात होऊ देणार नाही, अशी अतिशय चांगली भूमिका त्यांनी सुरूवातीला घेतली होती. नंतर राजकीय दबाब आल्यावर ते ढेपाळले. पोलिसिंग करताना सर्वांना खूष ठेवता येत नाही आणि तसे ठेवण्याचा अट्टहासही करु नये, हे जरा पाटील साहेबांनी लक्षात घेतलं पाहिजे. पोलीस, पत्रकार, न्यायाधीश हे व्यवसाय सर्वांना खूष करण्यासाठी वा सर्वांना मित्र बनविण्यासाठी नसतात. चांगल्या-वाईटाचा तटस्थपणे निवाडा करण्यासाठी या यंत्रणा आहेत, हे पाटील साहेबांना सांगण्याची गरज नाही. बाकी परवाच्या प्रकरणात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जी हुल्लडबाजी केली ती सुद्धा निषेधार्हच आहे. आपल्या नेत्यावर झालेल्या अनपेक्षित हल्ल्यामुळे संतापणं स्वाभाविक आहे, पण त्याचा राग आपल्याच शहरातील लोकांवर काढण्यात काही अर्थ नव्हता. शुक्रवारचं अमरावती बंदचं आयोजनही अनाठायी होतं. अशा बंदतून आपली राजकीय ताकद दाखविता येते पण शहरवासीयांना वेठीस धरण्याची काहीही गरज नव्हती. गेली चार वर्ष रावसाहेबांनी संयमी राजकारण केलं आहे. उरलेल्या कालावधीत त्यांनी तोच वसा कायम ठेवला, तर ते त्यांच्या भल्याचं ठरेल.

(लेखक दैनिक पुण्यनगरीचे कार्यकारी संपादक आहेत)

आमदारांचे ‘पिस्तूल’ आणि खासदारांचा बनावट ‘लेटर बॉम्ब’

सरलेला आठवडा अमरावतीसाठी चांगलाच इव्हेंटफुल राहिला. अमरावतीच्या दोन्ही आमदारांवर झालेले पिस्तूल रोखल्याचे आरोप, खासदार आनंदराव अडसूळांच्या लेटरहेडवर त्यांची बनावट सही करुन पोलीस आयुक्तांनी सात लाख रुपयांची लाच घेतल्याचा खळबळजनक आरोप, स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी आमदार रवी राणा व अनिल बोंडेंचं धरणे आंदोलन, अतवृष्टीग्रस्तांच्या पुनर्वसनाकरिता आमदार यशोमती ठाकुरांचं आपल्याच सरकारविरुद्धचं उपोषण, अमरावतीसारख्या पारंपारिक शहरात बायकांच्या अदलाबदलीचा होणारा विकृत खेळ या सार्‍या प्रकरणांनी हा आठवडा गाजला. 


 आमदारांनी पिस्तूल रोखल्याच्या प्रकरणांना काही जणांनी फार गंभीर स्वरुप देण्याचा प्रय▪केला. पण खूप गळा काढावा असं त्यात काही नव्हतं. निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसे एकमेकांना चिथावणी देण्याचे प्रकार वाढत आहे. हे प्रकारही त्यातूनच घडले आहे. रावसाहेबांच्या प्रकरणात दखल घ्यावं, असं काहीच नाही. त्यांच्या एकेकाळच्या मार्गदर्शकांनी त्यांना अडचणीत आणण्याच्या केलेला हा प्रय▪होता. हा प्रय▪फसला असला तरी आपल्या विरोधकांची संख्या चांगलीच वाढत चालली आहे, एवढंच रावसाहेबांनी जरा लक्षात घेतलं पाहिजे. रवी राणांनीही पिस्तूल वगैरे रोखलं असेल, असं एकंदरित घटनाक्रमावरुन वाटत नाही. रवी राणा व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधील भानगडी आता शहराला नवीन उरल्या नाहीत. एखाद्या आठवडयात असं काही झालं नाही, तर चुकल्याचुकल्यासारखं व्हावं, एवढं हे रुटीन झालं आहे. राणा आणि राष्ट्रवादीचे पदाधिकार्‍यांची लेव्हल एकच आहे, या निष्कर्षाप्रत अमरावतीकर आले आहे.

खरं तर राणांच्या सापळ्यात राष्ट्रवादीचे पदाधिकारी का अडकतात, हे कळायला मार्ग नाही. कुठल्या गोष्टीला विरोध करायचा आणि कुठल्या नाही, याचं भानचं राष्ट्रवादीचे पदाधिकारी हरवून बसले आहेत. त्यामुळे राणांना आपसूक प्रसिद्धीही मिळते आणि सहानुभूतीही. आता याच प्रकरणाचं घ्या, शारदानगरात आमदार रस्त्यावरचे खड्डे बुजविण्याच्या कामावर लक्ष ठेवत असतांना उपमहापौरांना त्यावर आक्षेप घेण्याचं काय कारण होतं? ते त्या वार्डाचे प्रतिनिधित्व करत असले, तरी त्या वॉर्डाची मालकी सरकारने त्यांच्याकडे दिली, असं तर नाहीच. रवी राणा हे आमदार आहेत, हेच स्वीकारण्याची राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांची तयारी नाही, हा त्यांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे रवी राणांनी काहीही केलं की, हे विरोध करायला पुढे येतात. यात त्यांचं हसं होतं. साडेबारा कोटीच्या अनुदान प्रकरणातही तसंच घडलं. सार्‍यांना रवी राणांची भूमिका पारदर्शक वाटली. खरं तर अमरावती जिल्ह्यातील सद्याच्या विद्यमान आमदारांमध्ये रवी राणांची कामगिरी सर्वात निकृष्ट आहे. स्वत:च्या घरासमोरील रस्त्यांवरील खड्डे न बुजवू शकणार्‍या राणांच्या खाती गेल्या चार वर्षात कुठलीही भरीव कामगिरी नाही. सरकारने ऑलरेडी मंजूर केलेल्या वा सहकारी आमदारांनी प्रयत्नपूर्वक खेचून आणलेल्या कामांचे श्रेय घेणे, मोठे नेते वा अधिकार्‍यांना गाठून जी कामं मंजूर झाली आहेत वा होणार आहेत, त्यासंदर्भातले निवेदन देतानाचे फोटो काढणे आणि ज्यातून काहीही साध्य होत नाही अशा उत्सवी कार्यक्रमांचं आयोजन करणे एवढीच राणांची कर्तबगारी (!) आहे. बडनेरा मतदारसंघाचे पर्यायाने अध्र्या अमरावतीचे आज जे धिंडवडे निघाले आहेत, त्यात राणाजींचा मोठा वाटा आहे. राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी राणांचा हा नाकर्तेपणा लोकांच्या लक्षात आणून दिला पाहिजे. ते करायचं सोडून यांची स्पर्धा त्यांच्या पोरकटपणाशी आहे. असो! पुर्वानूभव लक्षात घेता त्यात काही बदल होईल, असे दिसत नाही. मतदारांनाच पुढच्या निवडणुकीत आपल्या चुका दुरुस्त करायची सद्बुद्धी मिळो, एवढीच कामना आपण करु शकतो.

                                                              खासदार कोण?

पोलीस आयुक्तांसारख्या जबाबदार अधिकार्‍याविरुद्ध खासदार आनंदराव अडसूळ यांच्या लेटरहेडवर त्यांच्या बनावट सहीने सात लाख रुपयांची लाच घेतल्याचा खळबळजनक आरोप करणारी तक्रार राज्यपालांकडे केल्याचे गंभीर प्रकरण पुण्यनगरीने या आठवड्यात उघडकीस आणले. या प्रकरणात त्यांची बाजू समजून घेण्यासाठी पुण्यनगरीकडून सातत्याने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रय▪होत होता. मात्र डमी खासदार असणारे त्यांचे स्वीय सचिव त्यांच्यापर्यंत पोहोचूच देत नव्हते. शेवटी प्रकरणाची गंभीरता लक्षात आल्यानंतर खासदारांनी आपला लेखी खुलासा पाठविला. त्यांच्याकडून आता पोलीस तक्रारही झाली आहे.

मात्र खासदारांनी यानिमित्ताने जरा आपली यंत्रणा व व्यवस्थेचाही आढावा घेतला पाहिजे. खासदारांचा एकंदरित व्याप लक्षात घेता ते अतिशय व्यस्त असतात, हे समजून घेता येत असले तरी त्यांच्यावतीने त्यांचे स्वीय सहायक कुठल्याही गोष्टीवर उत्तर देतात, प्रतिक्रिया देतात, हे न समजण्यापलीकडचे आहे. कुठल्याही विषयावर माध्यमांना खासदारांचे मत जाणून घ्यायचे असल्यास त्यांचे स्वीय सचिवच खासदारांचे म्हणणे सांगून मोकळे होतात. अमरावतीच्या पत्रकारांचा हा नेहमीचा अनुभव आहे.

स्वीय सचिव हे प्रकार परस्पर करतात की, खासदारांनी त्यांना तसे अधिकार दिले आहेत, हे कळायला मार्ग नाही. मात्र खासदारांचीच या प्रकाराला संमती असेल, तर गंभीर प्रकार आहे. या प्रकरणात खासदारांनी आपला इंग्रजी पत्रव्यवहार हा दिल्ली येथून करण्यात येतो, असा खुलासा केला आहे. मात्र त्यांच्याकडील व्यवस्था लक्षात घेता लेटरहेड त्यांच्या यंत्रणेतून दुसरीकडे गेलंच नसेल, हे ठामपणे सांगता येत नाही. खासदार साहेब, काळजी घ्या. स्वीय सचिवांच्या हुशारीमुळे एखाद्यावेळी अडचणीत आलात, तर त्याला जबाबदार तुम्ही असाल.

(लेखक दैनिक पुण्यनगरीचे कार्यकारी संपादक आहेत)

आमदार प्रवीण पोटेंची ‘मुकुट संस्कृती’

केवळ नावापुरतं भारतीय जनता पक्षाचं कुंकू लावलेले आमदार प्रवीण पोटेंना सारं काही भव्यदिव्य आणि हटके करण्याची सवय आहे. बिल्डर म्हणून उभारलेल्या टाऊनशिप असो वा आधुनिक शिक्षणसम्राट म्हणून गुंफलेलं व्यावसायिक महाविद्यालयांचं जाळं, त्यांची एक वेगळी दृष्टी त्यातून दिसते. टाऊनशिप उभी करताना शे-दोनशे घरं उभे करुन ते स्वस्थ बसले नाहीत, अख्ख शहर नवीन वसविल्यासारखं डुप्लेक्स बंगल्यांची माळ त्यांनी उभी केली. तोच कित्ता शिक्षणसंस्थांची दुकानदारी उभी करतांना त्यांनी गिरविला. अनेक शिक्षणसंस्थाचालकांची एक इंजिनिअरिंग कॉलेज चालवितांना दमछाक होते. यांनी एका झटक्यात दोन कॉलेज आणले. एमबीए, डी.एड़, बी. एड हे बाकी वेगळंचं. कॉलेजही कशी चकाचक. एकेका वर्गात चार-चार एअर कन्डिनशर. कॉम्प्युटर लॅबमध्ये कॉम्प्युटरच कॉम्प्युटर. मुळात प्रवीणभाऊंची दृष्टीच व्यापक आहे. लहानसहान कामात ते हातच टाकत नाही. 


चार-पाच वर्षापूर्वी सामूहिक विवाह सोहळ्याचं त्यांनी आयोजन केलं होतं, त्यातही हजारेक लग्न त्यांनी लावले होते. जे काही करायचं ते डोळे दीपविणारं करायचं, हा त्यांचा निर्धार असतो. दुनिया झुकती है, और बिकती है, या मंत्रावर आणि पैसे पेरायचे आणि पैसे उगवायचे या नवीन लागवड तंत्रावर त्यांचा गजाननबाबांएवढाच ठाम विश्‍वास. बरं हे तत्वज्ञान अनुभवातून प्राप्त झालं असल्यानं डोक्यात कुठला गोंधळ नाही. गेल्या वर्षी झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत तेच तत्वज्ञान डोक्यात ठेवून कोटीच्या कोटी उड्डाणाव्दारे त्यांनी आमदार होण्याचं आपलं स्वप्न पूर्ण केलं. आपलं स्वप्न आपण आपल्या कर्तबगारीने प्रत्यक्षात आणलं असल्याचा ठाम विश्‍वास असल्याने मी काही केवळ भारतीय जनता पक्षामुळे आमदार झालो नाही, असे ते तेवढय़ाच आत्मविश्‍वासाने सांगत असतात. (त्यांच्या सांगण्यात काही फार चूक आहे, अशातलाही भाग नाही.) त्यांचा आत्मविश्‍वास नेहमीच जबरदस्त राहिला आहे. त्यामुळेच भाजपाची सत्ता आली किंवा नाही आली तरी २0१४ च्या निवडणुकीनंतर आपल्या गाडीवर लाल दिवा असेल, हे ते अतिशय सहजपणे सांगून जातात.

भारतीय जनता पक्षाचे स्थानिक नेते व कार्यकर्ते मात्र त्यांचा हा आत्मविश्‍वास पाहून तोंडात बोट घालतात. आता परवाचीच गोष्ट घ्या. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या बैठकीसाठी अमरावतीत आलेले भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह व प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीसांना त्यांनी घरी आमंत्रित केलं आणि सोन्याचं पॉलीश चढविलेले चांदीचे मुकूट त्यांच्या डोक्यावर चढविले. प्रवीणभाऊंच्या चाहत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. आपल्या प्रिय नेत्यांना असे मुकुट चढविणे हा प्रवीणभाऊंचा आवडता छंद आहे. दादासाहेब गवई पहिल्यांदा राज्यपाल झाले तेव्हा त्यांनी त्यांच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट चढविला होता. त्यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनाही त्यांनी असेच गौरवान्वित केले होते. नितीन गडकरींना त्यांनी मुकुट दिला की नाही, माहीत नाही. मात्र राजनाथसिंह व फडणवीसांच्या डोक्यावर तो चढला. आता प्रवीणभाऊंचे विरोधक काहीही बोलतात. गवई, राणेंना सोन्याचा मुकुट आणि ज्या भारतीय जनता पक्षाने त्यांना आमदारकी दिली त्यांच्या नेत्यांना चांदीचा मुकुट, हे कसं काय, असं ते विचारतात. पण या अशा लोकांकडे लक्ष द्यायचं नसतं. प्रवीणभाऊंच्या भावना लक्षात घ्यायचा असतात. मुकूट देऊन प्रवीणभाऊ बरंच काही काढून घेतात, असंही लोक बोलतात. आता लोकांचं काय, उचलली जीभ, लावली टाळ्याला असा प्रकार असतो. आणि शेवटी राजकारण हा देण्याघेण्याचाच खेळ आहे, हे प्रवीणभाऊंएवढं दुसर्‍या कोणाला माहीत असणार. आता त्या दिवशी प्रवीणभाऊ भाजपा नेत्यांना मुकुट परिधान करत होते, तेव्हा भाजपाचे जुने जाणते नेते अरुणभाऊ अडसड विषण्णपणे ते सारं पाहत होते. त्यांच्या डोळ्यासमोर जुने दिवस उभे झाले असतील. जेव्हा लोकांसमोर झोळी पसरुन एकेक रुपया जमा करुन त्यांनी निवडणुका लढविल्या होत्या. आता काही कोटी रुपये खर्च करुन दोन-चार महिन्यात माणसं आमदार होतात आणि मुकुटं घालून नेत्यांच्या जवळही जातात, हे पाहणं त्यांच्यासारख्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना सुन्न करणारं असेल.

पण करणार काय? दिवसच आता बदलले आहे. सगळीकडे पैसा बोलता है….हीच कॅसेट ऐकू येतेय. अशा परिस्थितीत प्रवीणभाऊंसारखी व्यावहारिक विचार करणारी व मोठी स्वप्नं पाहणारी माणसंच राजकीय पक्षांना हवी असतात. खरं तर मुकुटांच्या बदल्यात भारतीय जनता पक्षाने अमरावती जिल्ह्याची धुरा प्रवीणभाऊंकडे द्यायला हवी. एवढय़ा कर्तबगार माणसाच्या अनुभवाचा पक्षाने फायदा करुन घ्यायला नको का? पण नाही. साधा अमरावती शहराचा अध्यक्ष सुद्धा प्रवीणभाऊंच्या मताने केला नाही. कुठल्या निर्णय प्रक्रियेतही त्यांचा सल्ला घेतला जात नाही. त्यांचं पक्षासाठी काय योगदान आहे, असा तिरपट प्रश्न उपस्थित केला जातो. आयुष्यभर दारिद्रयात राहणार्‍यांना श्रीमंताबद्दल आकस असतो. तसं भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांचं प्रवीणभाऊंबद्दल झालं आहे. त्यांचं आयुष्य गेलं भगव्या झेंड्यासमोर राष्ट्राला मजबूत करण्याची शपथ घेत. प्रवीणभाऊंचं तसं थोडंच आहे. त्यांनी आपला व्यवसाय व संस्था मजबूत केल्या. त्यातून माणसं उभी केली आणि पुढे संधी मिळाली, तर ते राष्ट्रही मजबूत करतील. पण भाजपाच्या करंट्या कार्यकर्त्यांना याची जाण कुठे? राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सारे शीर्षस्थ नेते अमरावतीत असताना प्रवीण पोटेंनी भाजपा नेत्यांना मुकुट चढवायला नको होते, संघाच्या नेत्यांना हा उथळपणा आवडला नसेल, त्यातून त्यांची संस्कृती संघाला कळली असेल, असेही बरंच काही ते बोलताहेत. पण प्रवीणभाऊंनी त्यांची चिंता का करावी? मागे दहिहंडीच्या कार्यक्रमात थिल्लर फिल्मी गाण्यावर ठुमके मारतांना कुठे त्यांनी चिंता केली होती. तसंही त्यांना कुठे संघ परिवार, त्यांचा साधेपणा, त्यांची मूल्यं, तत्वं माहीत आहेत? या मूल्य-तत्वावेक्षा हिरव्या नोटांनीच त्यांना आयुष्यभर जीवाभावाची साथ दिली आहे. मोठं केलं आहे. बरं याउपरही त्यांना कोणी सांगितले असतं की, संघाचे नेते या मुकुट प्रकरणामुळे नाराज होऊ शकतात, तर त्यांनी संघाच्या नेत्यांनाही नाही चांदीचे, तर किमान तांब्याचे मुकुट नक्कीच घातले असते.

(लेखक दैनिक पुण्यनगरीचे कार्यकारी संपादक आहेत.)

भ्रमणध्वनी – ८८८८७४४७९६

रावसाहेबांची परीक्षा

अमरावती महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक आमदार रावसाहेब शेखावत यांची परीक्षा घेणार, असं दिसते आहे. रावसाहेबांकडून सभापतीपदासाठी सुगनचंद गुप्तांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या निर्णयामुळे काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये जबरदस्त नाराजी आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे. उघडपणे कोणी काही बोलायला तयार नाही. मात्र कुजबूज मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. पडद्यामागे जे काही बोललं जात आहे, ते रावसाहेबांच्या नक्कीच भल्याचं नाही. अजय नावंदर यांच्या दबावातून रावसाहेबांनी हा निर्णय घेतला असल्याचे सांगितलं जातं. हे जर खरं असेल, तर त्याचे पडसाद आगामी काळात निश्‍चितपणे उमटणार आहे. रावसाहेबांची अशी कोणती गुंडी नावंदरांकडे अडकली आहे की, ज्यामुळे आपल्या तमाम काँग्रेस नगरसेवकांचा विरोधाकडे दुर्लक्ष करून ते सुगनचंद गुप्तांना सभापतीपदावर बसवायला निघाले आहे, हा प्रश्न सार्‍यांनाच पडला आहे. त्याची जी काही वेगवेगळी उत्तरं येत आहे, ती रावसाहेबांच्या प्रतिमेवर शिंतोडे उडविणारी आहेत. 
नावंदर आणि रावसाहेबांचे एकमेकांबद्दलचे ममत्व विधानपरिषदेच्या निवडणुकीत जगजाहीर झाले होते. त्यावेळी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार बबलू देशमुखांना मदत करण्याऐवजी रावसाहेबांनी अजय नावंदर यांना मदत केल्याचे त्यांच्यावर आरोप झाले होते. त्या निवडणुकीत नावंदरांना मिळालेली मते आणि देशमुखांच्या पराभवामुळे त्या आरोपात तथ्य असल्याचीही बाब समोर आली होती. काँग्रेसच्या त्या पराभवाची खुद्द मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांनी गंभीर दखल घेतली होती. त्या घटनाक्रमाला जास्त दिवस झाले नसतांना रावसाहेब पुन्हा एकदा नावंदरांच्या मताने राजकारण करणार असतील, तर भविष्यात त्याचे परिणाम भोगण्याची तयारीही त्यांनी ठेवली असली पाहिजे.

अमरावतीचा जो कोणी आमदार असतो त्याच्या राजकारणावर नगरसेवकांच्या राजी-नाराजीचा मोठा परिणाम होत असतो. डॉ. सुनील देशमुखांनी २00७ च्या महानगरपालिका निवडणुकीत तेव्हाच्या काही विद्यमान नगरसेवकांना तिकीट दिले नव्हते. त्याचा डूख धरून त्या नगरसेवकांनी कोणाच्याही ध्यानी-मनी नसलेल्या रावसाहेबांना पुढे आणले होते. हा इतिहास रावसाहेबांपेक्षा जास्त कोणाला माहीत असण्याची शक्यताच नाही. त्यामुळे आपले वैयक्तिक स्नेहबंध जपण्याच्या नादात नगरसेवकांकडे दुर्लक्ष करायचे का, याचा निर्णय रावसाहेबांना घ्यावा लागणार आहे. विलास इंगोलेंच्या हातात स्थायी समिती जाऊ द्यायची नाही, इथपर्यंतचं राजकारण सारेच समजू शकतात. मात्र सुगनचंद गुप्तांचं नाव सार्‍यांनाच अनपेक्षित होतं. निवडणूक दीड वर्षावर आली असतांना ज्यांच्या विश्‍वासार्हतेबद्दल अद्याप खात्री पटली नाही, त्या विलास इंगोलेंना स्थायी समितीपासून दूर ठेवायचं याबाबत काँग्रेसचे गटनेते बबलू शेखावतांपासून बर्‍याच जणांचं एकमत असू शकते. मात्र जे नाव समोर आलं आहे, ते कोणाच्याच पचनी पडणारं नाहीय. त्यामुळेच काँग्रेसमधील इतर कोणालाही सभापती करा, पण नावंदरांचा माणूस नको, असा सूर उमटत आहे. त्यातूनच राजेंद्र महल्लेंच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसमधील बेकी लक्षात घेऊन शिवसेनेच्या दिगंबर डहाकेंनीही रिंगणात उतरण्याची तयारी चालविली आहे. प्रत्यक्षात काय होईल, हे बुधवारी समजेल. हात वर करून मतदान होणार असल्याने प्रत्यक्षात कोणी बंडखोरी करणारही नाही. पण या निवडणुकीच्यानिमित्ताने नगरसेवकांमध्ये नाराजीची जी बीजं पेरली जातील, त्याची विषारी फळं रावसाहेबांना नक्कीच चाखावी लागतील.

अडसूळ साहेब, मनाला लावून घेऊ नका!

प्रतिभाताई पाटील यांचा राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर येणार्‍या रेल्वे बजेटमध्ये अमरावतीच्या वाट्याला काय येते, याबाबत सार्‍यांनाच उत्सुकता होती. अमरावती-नरखेड पॅसेंजर सोडली, तर यावेळी कुठलीही नवीन गाडी मिळाली नाही. यामुळे खासदारांसह अनेकांची निराशा झाली. मात्र जे काही मिळालं ते काही कमी मिळालं नाही. राजापेठ रेल्वे उड्डाण पूल, वॅगन दुरूस्ती फॅक्टरी, मॉडेल रेल्वे स्टेशनसाठी अधिकचा निधी, बडनेर्‍यात सरकता जिना, लिफ्ट आदी सुविधांची घोषणा झाली. विदर्भात नागपूरसोडून इतर ९ जिल्ह्यांच्या वाट्याला काहीच आलं नाही. ते पाहता अमरावतीला बर्‍यापैकी मिळालं. रेल्वे मंत्रालयात भल्याभल्याचं चालत नाही. गेले पाच वर्ष प्रतिभाताई राष्ट्रपतीपदावर होत्या म्हणून अमरावतीवर रेल्वेची मेहरबानी होती, हे जरा समजून घेतलं पाहिजे. आता यावर्षी किमान चार-पाच गोष्टी मिळाल्या. पुढच्यावर्षी काहीच मिळणार नाही, लिहून घ्या. अमरावतीचे खासदार आनंदराव अडसूळ रेल्वे विषयात गेले वर्षभर सातत्याने प्रसिद्धीपत्रकांचा मारा करत होते. त्यामुळे त्यांची निराशा समजून घेण्याजोगी आहे. मात्र दिल्ली आणि रेल्वे मंत्रालय कसं काम करते, हे चांगलं माहीत असतांना अडसुळांनी उगाच मनाला लावून घेण्याचं काही कारण नाही. गेले चार वर्ष प्रतिभाताईंच्या राष्ट्रपतीपदाच्या माध्यमातून जे काही मिळालं, त्याचं श्रेय त्यांना घेता आलं.त्या अर्थाने ते भाग्यवान ठरले. एरवी देशातील आठशेच्या जवळपास खासदार दरवर्षी हजारो मागण्या रेल्वेमंत्रालयाकडे रेटत असतात. त्याचं काहीही होत नाही. आता खासदारांसहीत अमरावतीच्या सर्वपक्षीय नेत्यांनी नवनवीन मागण्या करण्यापेक्षा जे काही मंजूर झालं आहे, ते पूर्णत्वास कसं जाईल याकडे लक्ष दिलं पाहिजे.

(लेखक दैनिक पुण्य नगरीचे वृत्तसंपादक आहेत)

भ्रमणध्वनी-८८८८७४४७९६

कहा गये वो लोग..

                                        हवा हुये वो दिन
               
                                                जब पसीना भी गुलाब था
                                                               अब इत्र  भी मलते है
                                                               तो खुशबू नही आती 

देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील गेल्या दहा-बारा दिवसांपासून अमरावतीत आहेत. त्यांचा यावेळचा दौरा आणि राष्ट्रपती असतानाचे दौरे, यातला एक फरक अगदी प्रकर्षाने जाणवितो आहे. तो म्हणजे, त्यांच्या सभोवतालची माणसं आटली आहेत. राष्ट्रपती असतांना प्रतिभाताई तीनदा अमरावतीत आल्या, त्या तीनही दौर्‍यात त्यांना भेटायला, त्यांच्यासोबत फोटो काढायला अफाट गर्दी लोटली होती. विश्रमभवनावर ताईंना भेटायला एकेक किलोमीटरच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दृष्य अमरावतीकर अद्याप विसरले नाहीत. हौसे-गवसे-नवसे सारे त्या रांगांमध्ये असायचे. त्या पाश्र्वभूमीवर आताचं दृष्य त्यांच्या चाहत्यांना अस्वस्थ करणारं आहे. शेखावत कुटुंबाचे स्नेही, सरकारी अधिकारी व काही हितसंबंधी सोडलेत, तर सामान्य माणसांची गर्दी यावेळी ओसरली आहे. तरी बरं, त्यांचे सुपुत्र रावसाहेब शेखावत अद्याप सत्तेत आहेत. आमदार आहेत.अर्थात ही गर्दी कमी होण्यामागे प्रतिभाताईंचा काही दोष आहे, अशातला भाग नाही.


 त्या राष्ट्रपतीच्या खुर्चीत असताना त्यांनी आपल्या क्षमता व मर्यादेनुसार अमरावतीसाठी जेवढं करता येईल, तेवढं केलं. मुलाच्या आमदारकीसाठी हट्ट केला नसता, तर त्यांना आणखी बरंच काही करता आलं असतं का, यावर आता खूप चर्चा झडून गेलीय. ते विषय पुन्हा-पुन्हा उकरण्यात अर्थ नाही. त्यांच्या राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळात सामान्य अमरावतीकरांना जेवढं खूष करता येईल, तेवढं शेखावत कुटुंबाने केलं. पाच वर्षात किमान लाखभर लोकांना दिल्लीची, राष्ट्रपती भवनाची सफर त्यांनी घडवून आणली. येथे अमरावतीतही वेगवेगळी विकास कामं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. मात्र शेवटी राष्ट्रपतीपद जरी असलं, तरी त्यालाही मर्यादा असतातच., हे आता सार्‍यांच्याच लक्षात आलं, हे बरं झालं.
शेवटी लोकांच्या अपेक्षा या कधीच पूर्ण नाही. नेमकं काय केलं, म्हणजे लोक समाधानी होतात, याचं उत्तर अद्याप कुठल्याही राजकारण्याला मिळालं नाही. त्यामुळे अमरावतीकरांच्या अमुक अपेक्षा पूर्ण केल्या असत्या, तर प्रतिभाताईंभोवतीची गर्दी कायम राहिली असती, असे खात्रीने म्हणता येत नाही. सत्ता गेली की, सामान्य माणसंच कशाला, जवळची माणसंही दूर जातात, हा अनुभव राजकारण्यांना,अधिकार्‍यांना नवा नाही. सत्ता आणि संपत्ती या दोन गोष्टी अशा आहेत, त्या असल्या म्हणजे माणसं गुळाच्या भेलीला चिपकणार्‍या माशांसारखे चिपकतात. त्या गोष्टी गेल्यात

की, माणसं दूर जातात. अगदी दुराव्याने वागतात. अगदी भले-भले सत्तेवर नसताना एकाकी पडल्याचे चित्र आपण पाहिले आहे. आणिबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत इंदिरा गांधी पराभूत झाल्यानंतर हाताच्या बोटावर मोजण्याइतकी माणसं सोडलीत, तर त्यांच्यासोबत कोणी नव्हतं. त्यावेळी पंतप्रधानांचा 1, सफदरजंग रोड हा बंगला सोडल्यानंतर त्यांना दिल्लीत राहायला स्वत:चं घरही नव्हतं. एका मित्राने त्यांना स्वत:चा बंगला दिल्याने दिवस कसेबसे निभावले. महाराष्ट्रातही अशी अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत. यशवंतराव चव्हाणांच्या शेवटच्या काळात इंदिरा गांधींनी त्यांना जाणिवपूर्वक वाळीत टाकल्यानंतर त्यांची झालेली दयनीय अवस्था शरद पवार अजून विसरले नाहीत. (त्यामुळे सत्ता आणि पैसा कायम आपल्याजवळ राहिलं, याची काळजी ते घेतात.) सत्ता गेल्यानंतर माणसांनी पाठ फिरविण्याचे शेकडो उदाहरणं आहेत. शंकरराव चव्हाण, बाबासाहेब भोसले, शिवाजीराव पाटील निलंगेकरांपासून अशोक चव्हाणांपर्यंत, अनेकांची स्थिती सत्ता गेल्यानंतर केविलवाणी झाल्याचं महाराष्ट्रानं पाहिलं आहे. आपल्या जिल्ह्याचा विचार केला, तर राज्यपाल, विधानसभा उपाध्यक्ष, मंत्री अशा पदांवर राहिलेली माणसं कशी आहेत, ती काय करतात, याचं आता कोणालाही सोयरसुतक नसल्याचं दिसून येतं. पाच वर्षापूर्वी सुनील देशमुखांच्या, अनंत गुढेंच्या बंगल्यावर किती गर्दी राहायची. आता मुष्किलीने आठ-दहा माणसं राहतात. एखादादुसरा अपवाद सोडला, तर कुठल्याही माजी लोकप्रतिनिधींचे हे असेच हाल आहेत. ते एखाद्या कार्यक्रमात उशीरा पोहोचले, तर लोक साधी खुर्चीही त्यांना देत नाही. (हे सारं पाहून सामान्य माणसं कृत
घ्न  तर नाही ना, असाही प्रश्न अनेकदा पडतो.) अर्थात यातून सत्तेवर असलेला कुठलाही विद्यमान राजकारणी काहीही शिकत नाही. तो आपल्या मस्तीत-गुर्मीतच राहतो. सत्तेची हीच खरी मजा असते. ती वास्तवाचं भान तुम्हाला कधी येऊच देत नाही. सत्ता गेल्यानंतर माणसं जेव्हा पाठ फिरवितात, तेव्हाच फक्त त्यांना प्रश्न पडतो, कहा गये वो लोग..
                              

                      प्रभाकरराव, संस्था चालविणारी माणसं उभी करा

श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ (एचव्हीपीएम) ही संस्था केवळ अमरावतीचेच नव्हे, तर विदर्भाचे भूषण आहे. एखाद्या संस्थेने किती माणसं घडविलीत आणि किती माणसं उभी केलीत, हा जर निकष मानला, तर या संस्थेला महाराष्ट्रात तोड नाही. दैदिप्यमान इतिहास असलेल्या या संस्थेने यावर्षी शंभराव्या वर्षात पदार्पण केलं आहे. शताब्दी वर्ष महोत्सवाची सुरूवात तीन दिवसाच्या पारंपारिक क्रीडा संस्कृतीवरील जागतिक महोत्सवाने नुकतीच झाली. एचव्हीपीएमच्या नेहमीच्या शिस्तीत व उत्साहात तो पार पडला. मात्र काही गोष्टी अस्वस्थ करणार्‍या आहेत. देशभर लौकिक असणारी एवढी मोठी संस्था, पण या संस्थेचा शताब्दी महोत्सव सुरू झाला याची अमरावतीच्या बाहेर कुठेही खबरबात नव्हती. एवढा मोठा कार्यक्रम, पण पाहिजे तशी कुठलीही तयारी नाही, नियोजन नाही, पैसा नाही. प्रसिद्धीची यंत्रणा नाही. शेवटच्या क्षणापर्यंत सार्‍याच विषयात बोंबाबोंब होती. शताब्दी महोत्सवानिमित्त संस्थेने मुख्यमंर्त्यांना आमंत्रित केलं होतं, पण ते आले नाही. मदतीसाठी संस्थेने केलेल्या विनंतीकडेही दुर्लक्ष केलं.या क्षणापर्यंत तरी सरकारने कवडीचीही मदत केली नाही. राजकारण्यांच्या शिक्षणसंस्थांना मदत देण्यास सरकारजवळ पैसा असतो, मात्र माणसं घडविणार्‍या व सामाजिक कार्यात कायम अग्रेसर राहणार्‍या संस्थेसाठी पैसा नसावा, हे अतिशय खेदजनक चित्र आहे. ज्या अमरावतीकरांची मान एचव्हीपीएममुळे अभिमानामुळे उंच असते, त्यांनाही संस्थेला काही मदत करावीशी वाटली नाही. तथाकथित संत-महाराजांच्या भागवत कथेला अकरा-अकरा लाख रूपये देणार्‍या अमरावतीच्या धनाढय़ांना एचव्हीपीएमला अकरा रूपयेही द्यावेसे वाटले नाही. ज्या संस्थेने लाखो विद्यार्थी घडविले, त्यांनाही कृतज्ञता म्हणून संस्थेला मदत करावीशी वाटली नाही. संताप यावा असाच हा प्रकार आहे. मात्र अशाप्रकारची मदत मिळावी याचं नियोजन करण्यात संस्थाही कमी पडली. संस्थेत प्रभाकरराव वैद्यांभोवती सारा कारभार फिरतो. त्यांना सल्ला देणारे पायलीला पन्नास आहेत. मात्र सारे सुमार आहेत. एकाहीजवळ दूरदृष्टी नाही. सत्ताधार्‍यांना कसे हाताळायचे याची उमज नाही.नियोजन करण्याची पात्रता नाही. पैसे उभे करण्याची धमक नाही. परिणामी एवढा मोठा कार्यक्रम ‘लोकल’ झाला. प्रभाकररावांनी विद्यार्थी खूप घडविले, पण संस्था चालवू शकतील, अशी माणसं त्यांना उभी करता आली नाही. याविषयात त्यांनी गांभीर्याने लक्ष घातलं नाही, तर आगामी काळात या संस्थेचं काही खरं नाही.

(लेखक दैनिक पुण्य नगरीचे वृत्त संपादक आहेत.)

मो.8888744796

सुनील देशमुखांचा ‘लेटर बॉम्ब’

माजी राष्ट्रपती व अमरावतीचे आमदार रावसाहेब शेखावत यांच्या ‘गॉडमदर’ प्रतिभाताई पाटील गावात असतांना माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी एलबीटी वसुलीच्या (स्थानिक संस्था कर) विषयावर लेटरबॉम्ब फोडला आहे. ‘स्थानिक आमदारामध्ये समाजहिताच्या विचाराचां अभाव असल्याने एलबीटीसारख्या सक्षम करप्रणालीचा बट्टयाबोळ झाला’, अशी थेट टीका त्यांनी रावसाहेबांवर केली आहे. हेनरिक इब्सेन या नार्वेजीयन नाटककाराचा हवाला देत त्यांनी रावसाहेब, मनपातील त्यांचे पदाधिकारी व अधिकार्‍यांना ‘एनिमी ऑफ द पिपल’ (जनतेचे शत्रू) ठरविले आहे. पुराव्यादाखल त्यांनी राज्यातील वसई-विरार, मीरा-भायंदर, जळगांव, नांदेड, कोल्हापूर व औरंगाबाद या महानगरपालिकेतील एलबीटी वसुलीचे आकडे मांडले आहेत. या महापालिका एलबीटीमुळे फायद्यात आल्या असतांना अमरावतीलाच हे का जमत नाही, हा प्रश्न उपस्थित करतांनाच ‘रावसाहेबांचा नाकर्तेपणा व ही कर प्रणाली अमरावतीत अपयशी व्हावी यासाठी पदाधिकार्‍यांनी केलेले जाणिवपूर्वक प्रयत्न’, असे त्या प्रश्नांचे उत्तरही देऊन डॉक्टर मोकळे झाले आहेत.


 तीन वर्ष शांत राहिल्यानंतर डॉक्टरांनी आता आक्रमक व्हायचं, असं ठरविलं दिसते. एकीकडे रावसाहेबांना एलबीटीच्या मुद्दय़ावर अडचणीत आणताना दुसरीकडे ‘फेसबुक’ या सोशल नेटवर्कीग साईटवर त्यांनी थेट प्रतिभाताईंनाच घेरण्याचा प्रयत्न केला आहे. परवा प्रतिभाताईंनी अमरावतीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपण बलात्कार्‍यांना माफी दिली नव्हती, असा खुलासा केला होता. त्यावर डॉक्टर देशमुखांनी ‘सर्वोच्च न्यायालयाने फाशी दिलेल्या तीनही बलात्कारी आरोपींना आपण राष्ट्रपती म्हणून सजा माफ केली. माननीय ताई, आपल्या करणी आणि वक्तव्यात विसंवाद आहे. सामान्य जनतेने नेमकं काय समजायचं?’ असा प्रश्न फेसबुकवर उपस्थित केला आहे. देशमुखांच्या या प्रश्नावर बहुतांश नेटीझन्सनी प्रतिभाताईंच्या विरोधात कॉमेन्टस् दिल्या आहेत.

सुनील देशमुखांची तडफड, तगमग व संताप समजून घेण्याजोगा आहे. तीन वर्षापूर्वी शेखावत कुटुंबाने देशातील सर्वोच्च सत्तास्थानाचा वापर करून ज्या पद्धतीने त्यांचं ऐन भरात असलेलं राजकारण उद्ध्वस्त केलं, ते लक्षात घेता डॉक्टर देशमुखांची ती जखम कधी भरून येईल, असं वाटत नाही. त्यामुळे अलीकडे प्रतिभाताई व रावसाहेबांना एक्सपोज करण्याची कुठलीही संधी ते सोडत नाही. (त्यांचं फेसबुकवरचं पेज याला साक्षी आहे.)त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने हे चांगलं की वाईट यावर तथाकथित राजकीय तज्ञ चर्चा करतील. भूमिका घेण्याची किंमत त्यांनी यापूर्वीही मोजली आहे. पुढेही ती मोजायची त्यांची तयारी आहे, हे त्यांच्या पत्रावरून, कॉमेन्टसवरून दिसते. त्यांच्या या पत्राचे काय पडसाद उमटतात, रावसाहेब व त्यांचे समर्थक कसे रिअँक्ट होतात, हे आगामी काही दिवसांत कळेलच. मात्र त्यांनी जे मुद्दे उपस्थित केले, ते निश्चितपणे विचार करण्याजोगे आहे. अमरावतीत स्थानिक कर प्रणाली (एलबीटी) अयशस्वी व्हावी, असाच मनपातील काही पदाधिकार्‍यांचा प्रयत्न होता, हे मनपा वतरुळात सारेच जाणतात. जकात ठेकेदाराकडून सुरू असलेली ‘रसद’ (पाकिट) कायम राहावी, हीच मनपातील माफियांची इच्छा होती. आम्ही हे एलबीटी प्रकरण उडवून लावतो, असे आश्वासन त्यांनी ठेकेदाराला दिले होते. मात्र मुख्यमंर्त्यांनी अमरावतीचे व्हॅटचे आकडे व इतर माहिती घेतल्यानंतर त्यांची डाळ शिजू दिली नाही. त्यामुळे त्यांचे मनसुबे तसेच राहिले. या सगळ्या प्रकरणात रावसाहेबांना किती दोषी ठरवायचं, यावर मात्र विचार करावा लागेल. मुळात रावसाहेब कुठल्याही विषयाच्या खोलात जात नाही. विलास इंगोले व बबलू शेखावत जे सांगतील त्याला ते मम म्हणतात. समजा त्यांनी महानगरपालिकेत लक्ष घालायचं मनातही आणलं तरीही पालिकेवर ज्यांची दुकानदारी अवलंबून आहेत, ते सर्वपक्षीय हेवीवेट सदस्य त्यांना कितपत खेळू देतील, हा प्रश्नच आहे. सुनील देशमुखांच्या काळात काही वेगळं होत होतं, अशातला भाग नाही. मात्र ते पालकमंत्री होते. मुंबईतून थेट पैसा खेचून आणण्याची धमक ठेवत होते. त्यामुळे गोष्टी दबून जात होत्या. आता पैसा आटला म्हटल्यानंतर बारीकसारिक गोष्टी चव्हाटय़ावर येतात. यावर इलाज एकच आहे. रावसाहेबांना कठोर व्हावं लागेल. मनपात किंवा मनपाच्या माध्यमातून जे काही चांगलं, वाईट होणारं आहे, त्याची पावती त्यांच्या नावानं फाटणारं आहे. त्यामुळे न केलेल्या पापाचे धनी ठरण्यापेक्षा पालिकेचा आर्थिक डोलारा कसा जाग्यावर येईल, याला त्यांनी प्राथमिकता दिली पाहिजे. विलास इंगोले, चेतन पवार, बबलू शेखावत, दिगंबर डहाके, प्रकाश बन्सोड आदी मनपातील महारथींनी जर ठरविलं, तर मनपा नफ्यात येते. (मनपा गाळात कशी फसते आणि ती बाहेर कशी काढता येऊ शकतो, हे यांच्यापेक्षा कोणाला जास्त माहीत नाही.) यांना जरा शहराची काळजी करा, असे पटविण्यात रावसाहेब यशस्वी झाले, तर काही फरक पडू शकतो. मात्र तसं जर झालं नाही, तर रावसाहेबांसमोरच्या अडचणी वाढत जाणार आहे. त्यामुळे आगामी काळात प्रतिभाताईही त्यांना वाचवू शकेल, अशी स्थिती उरणार नाही.

                                                          राष्ट्रवादी व राणांचा शिमगा

प्रत्येक काही दिवसानंतर एकमेकांविरूद्ध शिमगा करण्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेस व अपक्ष आमदार रवी राणांचा ‘पोट्टेशाही’ खेळ आता अमरावतीकरांच्या परिचयाचा झाला आहे. सरलेल्या आठवडय़ात आम्ही केलेल्या कामाचं श्रेय आमदार राणा घेत आहेत, या कारणावरून दोनवेळा राष्ट्रवादीच्या कार्यकत्र्यांनी त्यांच्या जाहीर कार्यक्रमात त्यांच्याविरूद्ध नारेबाजी केली व ‘रवी राणा चोर है..’, च्या घोषणा दिल्या. श्रेय उपटण्याची रवी राणांची प्रवृत्ती आता राजकारणात सार्‍यांनाच माहीत झाली आहे. त्याचा फटका केवळ खोडकेंनाच नाही, तर रावसाहेब, यशोमती ठाकूर व इतर नेत्यांनाही बसला आहे. तीन वर्षात विशेषत्वाने उल्लेख करावं, असं कुठलंही काम रवी राणांनी केलं नाही. साखर वाटप, किराणा वाटप असे चिल्लर उपक्रम त्यांनी राबविले. विधानसभेच्या निवडणुकीत चढलेली कल्हई लोकांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीत उतरविली. तरीही राणा सुधारले नाहीत. तशी शक्यताही नाही. खोडकेंना उकसविण्यात त्यांना विशेष आनंद मिळतो. खोडकेही याला बळी पडतात. या सार्‍या प्रक्रियेत आपणही राणाच्याच लाईनला जाऊन बसतो, याचं भान खोडकेंच्या कार्यकत्र्यांना उरत नाही. राणा-खोडकेंच्या या सुमार जुगलबंदीत अमरावतीच्या राजकारणाची पातळी कधी नव्हे एवढी खालावली आहे.

(लेखक दैनिक पुण्यनगरीचे वृत्तसंपादक आहेत)

भ्रमणध्वनी-8888744796

अज्ञात विवेकानंद

इतिहासातील काही व्यक्तिमत्त्वं अशी आहेत, ज्यांच्याबद्दल भारतीयांना अपार कुतूहल, श्रद्धा आणि आदरभाव आहे. स्वामी विवेकानंदांचं नाव यामध्ये अग्रणी आहे. अध्यात्माचा झेंडा जगभर रोवणारे आणि शिकागोत ‘बंधू आणि भगिनींनो..’ अशा संबोधनाने भाषणाला सुरुवात करून अमेरिकेला जिंकून घेणारे, एवढीच माहिती आपल्याला विवेकानंदांबद्दल असते. उणेपुरे 39 वर्ष, 5 महिने, 24 दिवसांचं आयुष्य जगलेल्या विवेकानंदांच्या आयुष्यातील असंख्य पैलू अद्यापही अज्ञातच आहेत. ख्यातनाम बंगाली लेखक शंकर यांनी मात्र ‘अचेना अजाना विवेकानंद’ (अनोळखी अपरिचित विवेकानंद) या पुस्तकाच्या माध्यमातून एक वेगळे विवेकानंद जगासमोर आणले आहेत. केवळ सात वर्षात या पुस्तकाच्या दीड लाखापेक्षा जास्त प्रती खपल्या आहेत. मराठीसह अनेक भाषांमध्ये पुस्तकाचा अनुवाद झाला आहे. 


विवेकानंदांचे भाऊ महेंद्रनाथ व भूपेंद्रनाथांनी लिहिलेल्या आठवणी, स्वामीजींच्या मानसकन्या भगिनी निवेदितांचे पुस्तक, स्वामीजींच्या सहकार्‍यांसह अनेकांनी लिहिलेली पुस्तकं, देशविदेशातील त्यांचा पत्रव्यवहार या सार्‍यांचा अभ्यास करून शंकर यांनी विवेकानंदांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक अज्ञात पैलू जगासमोर आणले आहेत. या पुस्तकाचं विशेष वैशिष्टय़ म्हणजे विवेकानंदांचं असामान्यत्व तर त्यातून जाणवतंच, पण त्यापेक्षा अधिक त्यांचं माणूसपण पानापानातून डोकावतं. संन्यास घेऊनही लौकिक जगावर माया करणारा, आई, भावंडे आणि सहकारी मित्रांमध्ये मन गुंतून बसलेला, त्यांच्याशी थट्टामस्करी करणारा, बहिणीच्या आत्महत्येमुळे डोळय़ात पाणी येणारा, नोकरीसाठी कोलकात्याच्या रस्त्यावर वणवण फिरणारा, घरातील मालमत्तेच्या वादावरून व्यथित झालेला, खाण्याची आणि खिलविण्याची आवड जोपासणारा, स्वयंपाकघरात अनेक यशस्वी-अयशस्वी प्रयोग करणारा, शेकडो आजारांशी निकराने झुंजणारा.. असे स्वामीजींचे चकित करणारे असंख्य रूपं या पुस्तकातून आपल्यासमोर येतात.
…………………….…………………….…………………….…………………….…………………….…………………….
विवेकानंदांच्या चेहर्‍यावरून ते अगदी शांत, संयमित असतील, असं वाटतं. मात्र त्यांच्या बालपणी ते अतिशय खोडकर होते. त्यांची आई भुवनेश्वरी सांगायच्या – ‘लहान असताना हा इतका व्रात्य होता की, याला सांभाळताना एक नाही, तर दोन आया हैराण व्हायच्या.’ विवेकानंदांची आई त्यांना प्रेमाने ‘बिलू’ म्हणायची. या बिलूचा पुढे ‘बीरेश्वर’ व नंतर ‘नरेन’ झाला. त्यांचे बीरेश्वर हे नाव बरेच वर्ष प्रचलित होते. त्यांचे आणखी एक लाडाचे नाव होते ‘ठेंगू साला.’ त्यांच्या एका आजोबाने विवेकानंदांच्या कमी उंचीमुळे त्यांना हे नाव दिले होते. त्यांच्या कुटुंबातील सारेजण पावणेसहा, सहा फूट उंच होते. विवेकानंदांना एकूण नऊ भावंडं होते. भुवनेश्वरींचे पहिले अपत्य मुलगा होता. त्यानंतर एक मुलगी झाली. मात्र जन्मानंतर काही महिन्यातच या दोघांचाही अकाली मृत्यू झाल्याने या दोघांचेही नाव वा इतर काही माहिती मिळत नाही. तिसरे अपत्य हारामणी ही मुलगी. ही 22 वर्षे जगली. त्यानंतरची स्वर्णमयी. ही दीर्घकाळ जगली. पाचवे अपत्यही मुलगीच. पण तीसुद्धा जगली नाही. विवेकानंद हे सहावे. सातवी किरणबाला, आठवी योगिंद्रबाला. नववे महेंद्रनाथ व दहावे भूपेंद्रनाथ. विवेकानंदांचे हे दोन्ही भाऊ दीर्घायुषी होते. त्यांनीच विवेकानंदांच्या अनेक आठवणी लिखित स्वरूपात नमूद करून ठेवल्या आहेत. मालमत्तेचे वाद सुरू होण्याअगोदर विवेकानंदांच्या घरची आर्थिक स्थिती भक्कम होती. त्यांना व त्यांच्या बहिणींना प्राथमिक शिक्षण मिशनरी शिक्षण संस्थेत मिळाले. त्यांच्या बहिणींना तर इंग्लिश शिक्षिका घरी शिकवायला यायच्या. आई भुवनेश्वरींनाही इंग्रजी चांगलं येत असे. त्या भगिनी निवेदितांसोबत इंग्रजीत चर्चा करत. विवेकानंदांनी पदवी कलाशाखेत घेतली. बहुतांश मोठय़ा माणसांसारखाच त्यांचाही हुशार विद्यार्थी म्हणून लौकिक नव्हताच. ज्या इंग्रजीवरील प्रभुत्वामुळे त्यांनी अमेरिका, युरोपला जिंकले, त्या इंग्रजीमध्ये त्यांना प्रवेश परीक्षेत सत्तेचाळीस, प्रथम वर्षाला शेहेचाळीस आणि पदवी परीक्षेत छपन्न गुण मिळाले होते. इतिहास, तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र या सार्‍या विषयात त्यांना सरासरी पन्नास, पंचावन्न गुण होते. विद्यालयाच्या परीक्षेतील गुणांचा आयुष्यातील परीक्षेसोबत काहीच संबंध नसतो, हे विवेकानंदांचे गुण पाहिले की पुन्हा पटते.

………………………………………….…………………….…………………….…………………….…………………….
विवेकानंदांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाचे अतिशय वाईट दिवस सुरू झाले. त्यांचे वडील विश्वनाथबाबूंच्या नावावर त्यांच्या एका मित्राने भरमसाठ कर्ज काढून ठेवले होते. दुसरीकडे विवेकानंदांच्या कुटुंबातही मालमत्तेची भांडणं इतकी विकोपाला गेली की, विवेकानंदांच्या आईंना मुलांना घेऊन घर सोडावं लागलं. एका दिवसात ते रस्त्यावर आले. अक्षरश: खायचे वांदे व्हायला लागले. तेव्हाचे अनुभव विवेकानंदांनी लिहून ठेवले आहेत – ‘बाबांचे सुतक फिटण्याआधीच नोकरीच्या शोधासाठी वणवण सुरू झाली. अनवाणी, उपाशीपोटी, फाटक्या कपडय़ात नोकरीसाठी अर्ज घेऊन मी दुपारच्या रणरणत्या उन्हात भटकत होतो. ऑफिसमागून ऑफिस पालथे घालत होतो. पण सगळीकडून नकार मिळत होता. माझी बाहेरच्या जगाशी झालेली ही पहिलीच ओळख अशी जिव्हारी लागली. खरीखुरी माणुसकी इथं मिळणं कठीण. दीनदुबळय़ांना इथं जागा नाही.’ एका अन्य ठिकाणी त्यांनी त्यावेळी घराची अवस्था कशी होती हे लिहून ठेवलंय -‘पहाटेच उठून घरात काय आहे-नाही, याचा अंदाज मी घेत असे. सगळ्यांना पुरेसं जेवण मिळू शकणार नाही, हे लक्षात येताच, मला एकेठिकाणी जेवायला बोलावलंय, असं आईला सांगून घराबाहेर पडत असे. मग कधी काही खात असे, तर कधी उपवास घडायचा. स्वाभिमानापायी घरात किंवा बाहेर, कोणाजवळ काही बोलत नसे.’ त्या काळात त्यांच्या काही मित्रांनी त्यांना वाईट मार्गाला लावण्याचाही प्रयत्न केला. एकेदिवशी दोन मित्रांनी त्यांना एका हॉटेलमध्ये नेले. तेथे त्यांनी दारू पिण्याचा सल्ला दिला. त्यानंतर गाणं-बजावणं झालं. काही वेळानंतर मित्रांनी त्यांना एका बाजूच्या खोलीत आराम करण्यास सांगितलं. तिथं ते एकटे पहुडले असता एक तरुण स्त्री खोलीत शिरली. ..हळूहळू तिनं आपलं खरं रूप दाखविलं आणि आपला हेतूही सांगितला. तेव्हा विवेकानंद ताबडतोब तेथून बाहेर पडले. घरी आल्यावर मात्र त्यांनी आईला गमतीने ‘आपण आज बाई व बाटलीची मजा चाखली’, हे सांगितलं. त्या काळात परिसरातील काही श्रीमंत देखण्या स्त्रियांचाही विवेकानंदांवर डोळा होता. विवेकानंदांनी त्यांचा स्वीकार केल्यास स्वत:ची संपूर्ण संपत्ती त्यांच्या नावावर करण्याचे आमिष त्यांनी दाखविले होते.घरची परिस्थिती अतिशय खराब असतानाही विवेकानंद या आमिषाला बळी पडले नाही.

………………………………………….…………………….…………………….…………………….…………………….
काही काळानंतर विवेकानंदांना एका शाळेत शिक्षक म्हणून नोकरी मिळाली. तिथे तीन महिने शिकविल्यानंतर चांपातला येथील एका अन्य शाळेत त्यांना मुख्याध्यापक म्हणून संधी मिळाली. त्या शाळेच्या सचिवांना मात्र विवेकानंद पसंत पडले नाहीत. त्यांनी विद्यार्थ्यांना या मुख्याध्यापकाला शिकविता येत नाही, अशी तक्रार करायला लावली. त्या तक्रारीचा आधार घेऊन त्यांनी विवेकानंदांना नोकरीवरून काढून टाकले. त्यानंतर गयेजवळ एका जमीनदाराकडे त्यांना एक नोकरी मिळाली. पण ते गेले नाहीत. दरम्यानच्या काळात ते रामकृष्ण परमहंसांच्या संपर्कात आले होते. त्यांचं सानिध्य आणि शिकवणीने ते एवढे भारून गेलेत की, वयाच्या 24 व्या वर्षी त्यांनी संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. तो विवेकानंदांचा नवीन जन्म होता. विवेकानंदांनी संन्यास घेतला खरा, पण आपली आई आणि भावंडं अपार दारिद्रय़ाशी झगडत असताना आपण संन्यास स्वीकारला याची बोच त्यांच्या संवेदनशील मनाला शेवटपर्यंत होती. त्यामुळे संन्यासीवस्थेतही आपल्या आईला नियमित आर्थिक मदत मिळावी, यासाठी ते धडपडत होते. कुटुंबातील मालमत्तेबाबत न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यातही ते लक्ष घालत होते. व्याख्यानं, पुस्तक लेखनाचं मानधन व शिष्य आदरपूर्वक देत असलेली सारी रक्कम ते आईकडे पाठवीत असे. स्वामीजींच्या आध्यात्मिक ज्ञानाने प्रभावित झालेले राजस्थानातील खेतडी संस्थानचे महाराज अजितसिंहांना त्यांनी आपली आई हयात असेपर्यंत तिला दरमहा शंभर रुपयांची मदत करा, अशी विनंती केली होती. आपल्या परदेशातील भक्तांनाही ते आईला मदत पाठवायला सांगत असे. स्वत:चे श्रद्ध करून संन्याशी झाल्यानंतरही आईबद्दलचं प्रेम त्यांनी शेवटपर्यंत सोडलं नाही. ‘जो आईची पूजा करत नाही, तो कधीच मोठा होत नाही’, असे ते सांगायचे.

………………………………………….…………………….…………………….…………………….……………………. युरोप, अमेरिकेतील स्वामी विवेकानंदांचं आयुष्य अगदी वेगळं होतं. तेथे त्यांनी सुख आणि कष्ट या दोन्ही गोष्टींचा मोठय़ा प्रमाणात अनुभव घेतला. तिथे त्यांना कधी रस्त्यावर रात्र काढावी लागली, तर कधी भक्तांनी त्यांना पंचतारांकित हॉटलेमध्ये ठेवले. तेथील वास्तव्याबाबत त्यांनी आपल्या एका भक्ताला पत्रात लिहिलं होतं-‘कलाकौशल्य आणि भोगविलास यामध्ये जशी ही माणसं बिनतोड आहेत, तशीच पैसा कमावण्यात आणि खर्च करण्यातही बेजोड.’ अमेरिकेत त्यांनी अध्यात्माचा जसा प्रसार केला, तसाच भारतीय खाद्यपदार्थाचाही केला. ‘अमेरिकेत वेदान्त आणि बिर्याणी यांचा एकाचवेळी प्रचार करण्याचं धाडसी काम त्यांनी केलं,’ असे एका लेखकाने नमूद करून ठेवलंय. मांसाहाराचं वावडं त्यांना कधीच नव्हतं. त्यांच्या कुटुंबात मासे आणि मटण पूर्वीपासून आवडीने खाल्लं जायचं. एकदा एका हॉटेलमध्ये मांसाहार करून आल्यानंतर त्यांनी रामकृष्ण परमहंसांना त्याबद्दल माहिती दिली होती. त्यावर त्यांनी कुठलीही नापसंती दर्शविली नव्हती. परमेश्वरप्राप्ती वा अध्यात्माच्या मार्गात मांसाहारामुळे काही अडचण निर्माण होते असे हे दोघेही गुरुशिष्य मानत नसे. स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेत असताना आपला खाण्याचा आणि खिलविण्याचा शौक मनापासून पूर्ण केला. अनेकदा स्वत:च स्वयंपाकघरात घुसून ते वेगवेगळ्या डिशेस तयार करत असे. त्यांचं त्या विषयातील कौशल्य पाहून सारेच अचंबित होत. अंडे आणि माशांचे अनेक रुचकर पदार्थ ते तयार करत. एका लेखकाने लिहून ठेवलं आहे की, ‘धर्माबद्दल काही न बोलता केवळ रसनेच्या रहस्यभेदात त्यांनी लक्ष घातले असते, तरी ते अमर झाले असते.’ अमेरिकेत असताना ते आईस्क्रिम आणि सिगारेटच्याही प्रेमात पडले होते. जेवल्यानंतर त्यांना गोड खायला आवडायचं. एकेप्रसंगी ते निवेदिताला म्हणाले होते- ‘माझ्यासारख्या माणसाचं सगळंच टोकाचं. मी भरपूर खाऊ शकतो. तसाच अजिबात काही न खाताही राहू शकतो. सतत धूम्रपान करतो आणि त्याशिवायही राहू शकतो. इंद्रियदमन करू शकतो. पण संवेदनांचं आकलन करणंही मला जमतं.’ अमेरिकेतील त्यांच्या वास्तव्याचे, त्यांच्या शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक स्थितीचे बारीकसारीक तपशील तेथील त्यांच्या शिष्यांनी लिहून ठेवले आहेत. ते सारं मुळातूनच वाचण्याजोगं आहे.

(संदर्भ- अज्ञात विवेकानंद, लेखक-शंकर , अनुवाद- मृणालिनी गडकरी, राजहंस प्रकाशन, पुणे)

(लेखक दैनिक ‘पुण्य नगरी’चे वृत्तसंपादक आहेत.)

भ्रमणध्वनी-8888744796