रावसाहेब, सावध व्हा!

अमरावतीचे आमदार रावसाहेब शेखावत यांचा लौकिक कारण नसतांना वाद निर्माण करण्यासाठी वा वादात पडण्यासाठी कधीच नव्हता. एक शांत आणि संयमित व्यक्तिमत्व अशीच त्यांची ख्याती आहे. असं असतानाही दोन अलग-अलग घटनांमुळे वेगळ्याच कारणांसाठी ते चर्चेत आले आहे. परवा दहिहांडीच्या कार्यक्रमात जो काही प्रकार घडला तो धक्कादायक, संतापजनकच होता. मात्र एका माथेफिरु तरुणाचा वेडेपणा एवढय़ा कारणमीमांसेवर हे प्रकरण सोडून देता येत नाही. रावसाहेबांनी या प्रकरणाबाबत ज्या शक्यता व्यक्त केल्या, त्याची निश्‍चितच तपासणी व्हायला हवी. ते म्हणतात त्याप्रमाणे त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांच्या चिथावणीवरुन हा प्रकार घडला असेल, तर ते अतिशय गंभीर आहे. ही शक्यता अजिबात नाकारता येत नाही. अमरावतीचं राजकारणाची पातळी सद्या ज्या पातळीवर घसरली आहे ते पाहता, रावसाहेब म्हणतात तसं घडलंच नसेल, असं म्हणता येत नाही. १५ दिवसांपूर्वी रावसाहेबांवर पिस्तूल रोखल्याचे आरोप व नंतर पोलीस तक्रार झाली होती. मात्र ते प्रकरण तक्रारकर्त्याच्याच अंगलट आल्याने विरोधकांनी हा दुसरा डाव तर रचला नाही, हे तपासायला हवं. 


अर्थात या प्रकरणाला आणखीही काही कंगोरे आहेत. आपल्याकडे नेत्याबद्दल निष्ठा दाखविण्यासाठी कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी करण्याचा प्रकार सामान्य असल्यामुळे त्या तरुणाची सविस्तर बाजू अजून समोर आली नाही. गेल्या दोन वर्षापासून गजेंद्र उंबरकर नावाचा तो तरुण रावसाहेबांचा निषेध करणारे स्लोगन लिहिलेले कपडे घालून महानगरपालिकेत व शहरात फिरत होता. रावसाहेबांच्या विद्याभारती महाविद्यालयाची डोनेशनची मागणी पूर्ण न करु शकल्याने आपलं आयुष्य बरबाद झालं, असं त्याचं म्हणणं होतं. याकडे लक्ष वेधण्यासाठी तो जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिकेत फिरत असे. वर्तमानपत्रांच्या कार्यालयांमधेही त्याने भरपूर चकरा मारल्या आहेत. पुण्यनगरी व काही वर्तमानपत्रांनी त्याचं म्हणणं, त्याची व्यथा याअगोदर प्रसिद्ध केली आहे. मात्र गेले पाच वर्ष रावसाहेबांकडे देशाची सर्वोच्च सत्ता नांदत असल्याने अधिकारी व बहुतांश माध्यमं त्यांच्यासमोर रांगण्यातच धन्यता मानत होते. त्यामुळे बहुतेक ठिकाणी गजेंद्रला वाटाण्याच्या अक्षताच लावण्यात आल्या होत्या. कुठेच न्याय मिळत नाही. कुठेच आपलं म्हणणं ऐकलं जात नाही यामुळे धुमसून त्याने परवाचं आततायी कृत्य केलं असेल, तर ते धोकादायक आहे. खरं तर राजकारणात कुठलीही गोष्ट कॅज्युअली घ्यायची नसते. गेली दोन वर्ष तो आपला निषेध नोंदवत असतांना, नाही रावसाहेब तर किमान रावसाहेबांचे शिलेदार म्हणविणार्‍यांनी हा प्रकार गंभीरतेने घ्यायला हवा होता. त्या तरुणाला भेटून त्याची समजूत काढायला हवी होती. त्याचं खरंच नुकसान झालं असेल, तर त्याची भरपाई करायला पाहिजे होती. पण कोणीही लक्ष दिलं नाही.

संतापाने धुमसणारी माणसं जीवावर उदार झाली असतात, ते काहीही करु शकतात, हे सर्वांनी कायम लक्षात ठेवायला हवं. गजेंद्रवर तो सांगतो तसा खरंच अन्याय झाला असेल, तर पोलीसांच्या तावडीतून बाहेर आल्यानंतर तो आणखी धोकादायक होईल, हे नक्की. पोलीसांकडून त्याच्यावर दडपशाही करणे हा सुद्धा इलाज नाही. रावसाहेबांनी त्याला बोलावून घेऊन त्याचं म्हणणं समजून घेतलं पाहिजे. शक्य असल्यास त्याचं समाधान केलं पाहिजे. परवाच्या प्रकरणाबाबत काँग्रेसचे पदाधिकारी पोलीस आयुक्तांविरुद्ध संताप व्यक्त करत आहेत. आयुक्त व्यासपीठावर असतांना असं घडलंच कसं, असा त्यांचा सवाल आहे. ज्या देशात शेकडो सुरक्षा रक्षकांच्या उपस्थितीत दोन पंतप्रधानांची हत्या व संसदेवर हल्ला होतो, तिथे काहीही होऊ शकते. याचा अर्थ पोलीस आयुक्तांचं काहीचं चुकलं नाही, असं नाही. या घटनाक्रमाचं जे व्हिडीओ फुटेज व फोटो उपलब्ध आहेत, त्यावरुन ते काहीसे उशीरा रिअँक्ट झाल्याचे लक्षात येते. पण अशा घटना इतक्या झटपट घडतात की, कृती करायचं भान काहीसं उशीरा येतं. ज्याक्षणी आयुक्तांना ते आलं त्यांनी परिस्थितीवर ताबा मिळविला. मात्र अजित पाटलांनी इफेक्टीव्ह पोलिसिंग कशाला म्हणतात हे जरा लक्षात घ्यायला हवं. सर्व प्रकारच्या शक्यता गृहित धरुन पोलीसांनी बंदोबस्त ठेवायचा असतो. पोलिस आयुक्तांनी सार्वजनिक कार्यक्रम जरा कमी करुन स्ट्रिक्ट पोलिसिंगकडे लक्ष दिले पाहिजे. यावर्षी दहिहांडीचे कार्यक्रम चौकात होऊ देणार नाही, अशी अतिशय चांगली भूमिका त्यांनी सुरूवातीला घेतली होती. नंतर राजकीय दबाब आल्यावर ते ढेपाळले. पोलिसिंग करताना सर्वांना खूष ठेवता येत नाही आणि तसे ठेवण्याचा अट्टहासही करु नये, हे जरा पाटील साहेबांनी लक्षात घेतलं पाहिजे. पोलीस, पत्रकार, न्यायाधीश हे व्यवसाय सर्वांना खूष करण्यासाठी वा सर्वांना मित्र बनविण्यासाठी नसतात. चांगल्या-वाईटाचा तटस्थपणे निवाडा करण्यासाठी या यंत्रणा आहेत, हे पाटील साहेबांना सांगण्याची गरज नाही. बाकी परवाच्या प्रकरणात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जी हुल्लडबाजी केली ती सुद्धा निषेधार्हच आहे. आपल्या नेत्यावर झालेल्या अनपेक्षित हल्ल्यामुळे संतापणं स्वाभाविक आहे, पण त्याचा राग आपल्याच शहरातील लोकांवर काढण्यात काही अर्थ नव्हता. शुक्रवारचं अमरावती बंदचं आयोजनही अनाठायी होतं. अशा बंदतून आपली राजकीय ताकद दाखविता येते पण शहरवासीयांना वेठीस धरण्याची काहीही गरज नव्हती. गेली चार वर्ष रावसाहेबांनी संयमी राजकारण केलं आहे. उरलेल्या कालावधीत त्यांनी तोच वसा कायम ठेवला, तर ते त्यांच्या भल्याचं ठरेल.

(लेखक दैनिक पुण्यनगरीचे कार्यकारी संपादक आहेत)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *