उत्सवाच्या नावाखाली तमाशा खूप झाला!

‘धर्म ही अफूची गोळी आहे’, हे कार्ल मार्क्‍स खूप आधी सांगून गेलाय. अमरावतीच्या विद्यमान नेत्यांना कार्ल मार्क्‍स वा त्याचं हे वाक्य माहीत असण्याची सुतराम शक्यता नाही. मात्र देवा-धर्माच्या नावाची अफूची गोळी जनतेला सार्‍या समस्यांचा विसर पाडते हे त्यांना नक्कीच माहीत असल्याचं दिसते आहे. गेल्या काही दिवसात अमरावतीत उत्सवाच्या नावाखाली धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनाची जी चढाओढ लागली आहे, ती कुठल्याही सुजाण नागरिकाला हतप्रभ करणारी आहे. निराश करणारी आहे. देवासमोर बळी देणार्‍या प्राण्याला वेदना कमी व्हाव्यात म्हणून ज्याप्रमाणे दारु पाजली जाते, मादक पदार्थांचं सेवन करविलं जातं, त्याच पद्धतीने शहरातील कुठल्याही मुलभूत समस्यांकडे जाऊ नये यासाठी अमरावतीकरांना सद्या धार्मिक उत्सवात चिंब भिजविलं जात आहे. यात कोणीही मागे नाही. शिवसेना व भारतीय जनता पक्षाचा, तर हा धंदाच आहे. पण काँग्रेस वा राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा यात कुठेही मागे नाही.


 सारं अमरावती शहर खड्डयांनी भरलं आहे. ‘अमरावती गेली खड्डयात’ म्हणण्याची पाळी आली आहे. कायदा व सुव्यवस्थेची पार ऐसीतैशी झाली आहे. आमदारांना सर्वांसमक्ष थापडा मारल्या जातात. चार वर्षापूर्वीची ‘स्वच्छ अमरावती, सुंदर अमरावती’ इतिहासजमा होऊन आता ‘गलिच्छ अमरावती, घाणेरडी अमरावती’ असे नवीन स्लोगन देण्याची वेळ आली. शहराचं स्वास्थ सांभाळण्याची जबाबदारी असलेली महानगरपालिका खाऊंचा अड्डा बनली आहे. एवढा मोठा फायबर मुत्रीघर घोटाळा होऊनही कोणी तोंड उघडायला तयार नाही. सांस्कृतिक भवन घोटाळा, हायड्रोलिक ऑटोचं घबाडं, रहदारी पास प्रकरण असे असंख्य घोटाळे असतांना मनपा आयुक्त वाईटपण घ्यायला तयार नाही. चोरांच्या भांडणात विशेष अनुदान म्हणून आलेले २५ कोटी रुपये बँकेत सडत आहे. शहराचे दोन्ही आमदार केवळ वैयक्तिक मानपमानाचे खेळ रंगवित आहेत. अमरावतीच्या सार्‍या समस्यांना जणू पोलीस आयुक्तच जबाबदार आहे, असं त्यांचं वागणं आहे. बालीश वागण्याच्या या स्पर्धेत विरोधकही तेवढय़ाच हिरीरीने सहभागी आहेत. मनपाच्या सभेत आवाज उठविल्याचा आभास निर्माण करुन आपला ‘वाटा’ सुरक्षित ठेवण्यात त्यांना रस आहे. असा सारा आनंदीआनंद असतांना भागवत कथा, दहिहंडी उत्सव, गणेशोत्सव मात्र जोरात आहे.

अलीकडच्या काही वर्षात आपली राजकीय दुकानदारी कायम ठेवण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी धार्मिक उत्सवांचा वापर करणे सुरू केले आहे. वेगवेगळ्या उत्सवात भरपूर पैसा ओतून कार्यकर्ते व जनतेला त्यात गुंतवून ठेवायचं. विचार करायला त्यांना संधीच द्यायची नाही, यापद्धतीने सारं सुरु आहे. दुर्दैवाची गोष्ट सामान्य माणसांच्या ते लक्षात येत नाहीय. आपल्या वॉर्डातील रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले आहेत, त्याबाबत नगरसेवक वा आमदाराला जाब विचारायचं सोडून माणसं पुराणातल्या भाकडकथांवर माना डोलवायला जातात. सार्‍या शहराची वाट लागली असतांना दहिहांडीत डीजेच्या तालावर कंबर हलविण्यात युवापिढी मदरुमकी मानते. आता पुढचे १0-१२ दिवस गणेशोत्सवाच्या नावाखाली शहराला वेठीस धरलं जाईल. उत्सव हे आपल्या पूर्वजांनी अतिशय उदात्त हेतून आणले आहेत.

त्याचा संबंध भक्ती, श्रद्धा, आनंदासोबत आहे. भारतीय माणसाच्या जीवनातील या सुंदर प्रकाराचा राजकारण्यांनी मात्र त्यांच्या फायद्यासाठी ‘इव्हेंट’ करुन टाकलाय. दहिहांडीच्या उत्सवात सुमार नट-नट्या, नर्तिका आणून त्यांच्यावर लाखो रुपये उधळायचे, हजारो लिटर पाणी वाया घालवायचं याला उत्सव म्हणायचं का? गेल्या काही वर्षापासून प्रत्येक जन्माष्टमीला दहिहांडीच्या नावाखाली राजकमल, राजापेठ या शहरातील सर्वाधिक गजबललेल्या चौकातील वाहतूक बंद केली जाते. एकाचं पाहून दुसरा या स्पर्धेत उतरतो. यावर्षी शिवसेनेनं जयस्तंभ चौक बंद केला. कुठल्याही पोलीस अधिकार्‍यामध्ये हा तमाशा थांबविण्याची हिंमत नाही. आता गणेशोत्सवातही हे असेच प्रकार आणि पैशाचा चुराडा होणार आहे. गेल्या काही वर्षात अमरावतीत देशातील प्रसिद्ध मंदिरं व वास्तूंची प्रतिकृती उभारण्याचं फॅड आलंय. येथेही एकाच पाहून दुसर्‍यांनं त्याचं अनुकरण केलं. यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात. यासाठी आम्ही वर्गणी जमा करत नाही. वेगवेगळी प्रतिष्ठानं व भाविक स्वत:हून मदत करतात, अशी मखलाखी गणेश मंडळाचे कर्तेधर्ते करतात. पण ही अशी मदत योगायोगाने वा श्रद्धेने मिळत नाही. ती एक वेगळ्या प्रकारची दुकानदारीच असते. गणपती व मंडळाचं कसं मार्केटींग केलं जातं, लोकांच्या श्रद्धेचा फायदा घेऊन समाजातील मान्यवरांना महापूजेला कसं बसविलं जातं, गणपतीच्या मूर्तीसमोर काचेची दानपेटी लावून भक्तांना दान देण्यासाठी कसं उद्युक्त केलं जातं याच्या खूप सुरस कहाण्या आहेत. वेगळ्या अर्थाने हा धंदाच आहे. या अशा उत्सवात खरा भक्तिभाव कुठे दिसत नाही. भक्तांना, श्रद्धाळूंना मनापासून आनंद मिळेल, असंही काही दिसत नाही. राजकारणी व गुंडांनी आता व्यवस्थेसोबत देवाधर्माला वेठीस धरल्यावर दुसरं होणारं तरी काय? राजकारण्यांच्या या धंद्यात मेंढरासारखी गर्दी करून आपणही सामिल होतो, हे त्यातलं दु:ख.

(लेखक दैनिक पुण्यनगरीचे कार्यकारी संपादक आहेत)

भ्रमणध्वनी-८८८८७४४७९६

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *