क्रिकेट -फिल्म

आर्चीचं काय होणार?

Written by admin
चित्रपटसृष्टीत कलावंत जोपर्यंत प्रकाशझोतात असतात तोपर्यंत पब्लिक त्यांना डोक्यावर घेऊन नाचते. अपयशी झालेत की, ढुंकूनही पाहत नाही. या पार्श्‍वभूमीवर वयाच्या केवळ १५ व्या वर्षी भल्याभल्यांच्या वाट्याला संपूर्ण आयुष्यात येत नाही, असं अद्भुत यश मिळविलेली आर्ची हे यश कसं पचविते, हे पाहणं रंजक ठरणार आहे.
……………………………………………………………………………………………………………………………………………

‘सैराट’ची आर्ची सध्या जिथे कुठे जाते, जे काय करते

त्याची बातमी होतेय. तिला पाहायला, भेटायला हजारोंची गर्दी लोटतेय. तरुण पिढीच्या गळ्यातील ती ताईत झालीय. सध्या ती अकलूजला राहत नाही, तरी केवळ तिचं घर पाहायला शेकडो तरुण रोज गर्दी करताहेत. परवा एका ‘रिअँलिटी शो’मध्ये ती सांगत होती, ‘लोक वेड्यासारखे मागे लागताहेत. अक्षरश: २0-२५ किलोमीटर लोक पाठलाग करताहेत.’ कुठल्याही सुपरस्टारला हेवा वाटावी, अशी ही लोकप्रियता आहे. आजपर्यंत मराठी चित्रपटातील कुठल्याही कलावंतासाठी लोक एवढे वेडे झाल्याचं उदाहरण नाही. म्हणूनच डोक्यात प्रश्न येतोय…आर्चीचं पुढे काय होणार? हे यश ती पचवू शकेल? उद्या अपयशाचा सामना करावा लागल्यास तिचं काय होणार?.. चित्रपटसृष्टीतील कलावंतांच्या यश-अपयशाच्या इतिहासातून हे प्रश्न डोकावतात. पहिल्याच चित्रपटाने लोकांना वेडंपिसं करून स्टार होण्याची उदाहरणं हिंदी आणि इतर चित्रपटसृष्टीत खूप आहेत. मात्र त्यापैकी फारच कमी कलावंत असे आहेत की, जे पुढे आपलं वलय, लोकप्रियता कायम ठेवू शकलेत.

पहिल्याच चित्रपटाने जबरदस्त यश मिळवून एका रात्रीत आयुष्य बदलण्याचं उदाहरण आठवायचं झाल्यास मराठमोळ्या भाग्यश्री पटवर्धनचं नाव चटकन डोळ्यासमोर येतं. १९८९ मध्ये आलेल्या ‘मैने प्यार किया’ या पहिल्याच चित्रपटाने भाग्यश्री देश-विदेशात स्टार झाली होती. सांगलीच्या राजघराण्यातील या तरुणीने तेव्हाच्या तरुणाईला वेड लावले होते. तिने चित्रपटात साकारलेली ‘सुमन’ तेव्हा तरुण मनाला चटका लावून गेली होती. त्यानंतर भाग्यश्रीला आपल्या चित्रपटात घेण्यासाठी निर्मात्यांनी रांगा लावल्या होत्या. मात्र लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच आपला शाळेतील मित्र हिमालय दासानीसोबत लग्न करून भाग्यश्रीने जबरदस्त धक्का दिला. ‘मैने प्यार किया’त उत्कट प्रेम साकारणार्‍या भाग्यश्रीने प्रत्यक्ष आयुष्यातही यशापेक्षा आपल्यासाठी प्रेम महत्त्वाचे आहे, हे दाखवून दिले होते. मात्र लग्न केलं तरी निर्माते तिला आपल्या सिनेमात घ्यायला तयार होते. मात्र तिने यापुढे आपण आपल्या नवर्‍यासोबतच काम करू, अशी अट घातल्याने ती गर्दी ओसरली. तिच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी काही निर्मात्यांनी तिच्या नवर्‍यासोबत तिला चित्रपटात घेतले. ‘कैद में है बुलबुल’ आदी एकदोन चित्रपटात ती हिमालयसोबत दिसली. मात्र हिमालय हा गुलशनकुमारचा भाऊ किशनकुमारसारखा (आठवतो का?) अगदीच ठोंब्या असल्याने लोकांनी त्याच्याकडे आणि भाग्यश्रीकडेही पाठ फिरविली. सिनेमाची मायावी नगरी फार काळ कोणासाठी थांबत नाही. भाग्यश्री संसारात रमली. नंतर तिने काही हिंदी, तेलुगू, भोजपुरी सिनेमात काम केलंय. ‘मुंबई आमचीच’, ‘झक मारली बायको केली’ या मराठी चित्रपटांतही ती दिसली. काही टीव्ही मालिकाही तिने केल्यात; पण लोकांनी तिच्याकडे पाठ फिरविली ती फिरवलीच. लोकांना फक्त आठवते ती ‘मैने प्यार किया’ची सुमन. पहिल्या चित्रपटाच्या अफाट यशानंतर अपयशाच्या गर्तेत गेलेल्या कलावंतांची यादी खूप मोठी आहे. मंदाकिनी (राम तेरी गंगा मैली), अनू अग्रवाल (आशिकी), कुमार गौरव (लव्ह स्टोरी), विजयता पंडित (लव्ह स्टोरी), रोजा (मधू रघुनाथ), दिव्या भारती (दिवाना), आयेशा झुल्का (जो जिता वही सिकंदर), ममता कुळकर्णी (करण-अर्जुन), महिमा चौधरी (परदेश), राहुल रॉय (आशिकी), राजीव कपूर (राम तेरी गंगा मैली), चंद्रचूड सिंग (माचिस), गायत्री जोशी (स्वदेश) अशी खूप सारी नावं सांगता येतील. यशाची पुनरावृत्ती न करता आल्याने ही नावे चित्रपटरसिकांच्या लक्षात आहेत; पण त्यांची ओळख ‘वन फिल्म स्टार’ अशीच आहे.

पहिल्या चित्रपटाच्या अद्भुत यशानंतर आलेल्या अपयशामुळे यातील अनेकांची पुढे परवड झाली. मंदाकिनीसारखी अभिनेत्री दाऊद इब्राहिमच्या नादी लागली. आता एका तिबेटी डॉक्टरसोबत लग्न करून मध्यमवर्गीयासारखी ती जगतेय. ममता कुळकर्णी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटच्या जाळ्यात सापडली. आज पोलिसांच्या जाळ्यात अडकू नये म्हणून एका देशातून दुसर्‍या देशात पळते आहे. दिव्या भारतीसारख्या सौंदर्यवती अभिनेत्रीला आत्महत्या करावी लागली. ज्या शहाण्या होत्या त्या उद्योगपतींना शोधून लग्न करून मोकळ्या झाल्यात. अनेकांनी दारूच्या ग्लासात आधार शोधला. अतिशय एकाकी आणि कुंठित अवस्थेत ते जगताहेत. चित्रपटसृष्टीत वर्षानुवर्षे यश मिळविणे हे हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या कलावंतांनाच जमते. बाकीच्यांची अशीच परवड होते. हे जग फारच विचित्र आहे. एकदा प्रकाशझोताची सवय लागली की, अपयश पचविणं फारच कठीण जातं. कधीकाळी सुपरस्टार असलेल्यांच्याही ते पचनी पडत नाही. एकाकीपणामुळे राजेश खन्नाने शेवटच्या काळात स्वत:ला दारूत बुडवून घेतले होते. गेल्या शतकातील अनेक लोकप्रिय कलावंतांची गत अशीच आहे. कधी कधी तर अतिशय विपन्नावस्थेत त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागते. साधना, ए. के. हंगल, ललिता पवार या एकेकाळच्या लोकप्रिय कलावंतांचा शेवट आठवला तरी शहारे येतात.

पण हे असंच आहे. चित्रपटसृष्टी आणि चित्रपटरसिकांनाही केवळ यशाची भाषा समजते. जोपर्यंत कलावंत प्रकाशझोतात असतात तोपर्यंत जनता त्यांना डोक्यावर घेऊन नाचते. मात्र अपयश वाट्याला आलं की, ते ढुंकूनही पाहत नाही.

या पार्श्‍वभूमीवर वयाच्या केवळ १५ व्या वर्षी भल्याभल्यांच्या वाट्याला संपूर्ण आयुष्यात येत नाही असं यश आर्ची (रिंकू राजगुरू) कसं पचविते, हे पाहणं रंजक ठरणार आहे. आर्चीला ‘सैराट’मुळे जी भन्नाट लोकप्रियता मिळाली त्यात तिच्यापेक्षा तिला ज्या पद्धतीने प्रोजेक्ट करण्यात आलं त्याचा मोठा वाटा आहे. अर्थातच तो दिग्दर्शक नागराज मंजुळेंचा आहे. ‘सैराट’चा हीरो ‘आर्ची’च आहे. संपूर्ण सिनेमा तिच्याभोवती फिरतो. एक मुलगी एखाद्या डेअरिंगबाज मुलासारखी वागते. प्रेम व्यक्त करण्यापासून सगळ्या विषयात पुढाकार घेते, ही गोष्ट अनेक फँटसी बाळगून असलेल्या सर्वसामान्य माणसाला जबरदस्त भावली. त्यामुळे केवळ मराठीच नाही, तर इतर भाषिक व अगदी परदेशातही हा सिनेमा डोक्यावर घेतला गेला. ‘सैराट’च्या पार्श्‍वभूमीवर आर्ची पुढे यश मिळवू शकेल का, हे सांगणं खूप कठीण आहे. ती या चित्रपटात दिग्दर्शकाची नायिका होती. म्हणजे दिग्दर्शकाने सांगितल्याप्रमाणे तिने आपली भूमिका साकारली. यापुढे केवळ तिच्यावर केंद्रित असेल असे नायिकाप्रधान चित्रपट तिला मिळतील का? नागराजने जशी तिच्या भूमिकेवर मेहनत घेतली, तशी संबंधित दिग्दर्शक घेतील का? ते नागराजच्या ताकदीचे असतील का? असे अनेक प्रश्न आर्चीच्या भवितव्याच्या विषयात महत्त्वाचे ठरणारे आहेत. आपल्याकडे रूढार्थाने नायिकेसाठी आवश्यक जे रंगरूप लागतं तसं गोरंगोमटं रूप आर्चीकडे नाहीय. मात्र तिचे डोळे बोलके आहेत आणि आत्मविश्‍वास जबरदस्त आहे. त्या जोरावर आपल्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे स्मिता पाटीलसारखे सिलेक्टिव्ह चित्रपट तिने केलेत, तर ती या फसव्या दुनियेत आपलं स्थान तयारही करू शकेल. ती सध्या खूपच लहान आहे. तिच्याबाबतीत आज जे काही घडताहेत ते एखादं सुरेख स्वप्न वा चमत्कारच तिला वाटत असणार.मात्र लवकरच प्रकाशझोत बाजूला सरून तिचा वास्तवासोबत सामना होणार आहे. त्यावेळी तिची कसोटी लागेल. असं.. जे काय व्हायचं ते होईल. मात्र तिने इतिहास घडविला आहे. जोपर्यंत चित्रपटसृष्टी अस्तित्वात आहे तोपर्यंत ‘सैराट’ आणि ‘आर्ची’ लोकांच्या विस्मरणात जाणार नाही, हे तर नक्कीच.

About the author

admin

6 Comments

Leave a Comment