सोशल

संताप पुरुषातील जनावरांबद्दल हवा

Written by admin
बलात्कार्‍याला जात नसतेच. कुठल्याही समाजातला, धर्मातला लिंगपिसाट हे असे प्रकार करू शकतो. संताप हा या अशा पुरुषांमधल्या जनावरी वृत्तीचा हवा; त्याच्या जातीचा नाही. कोपर्डी प्रकरणाला जाणीवपूर्वक जातीय रंग देण्याचा प्रयत्न  झाला. माणसं या अशा गंभीर प्रकरणातही जात विसरत नाही, हे संतापजनक आहे. अशा विकृतांना नागडं करून फोकाने झोडपून काढलं पाहिजे.
……………………………………………………………………………………………………………..
  अहमदनगरमधील कोपर्डीच्या बलात्कार

प्रकरणाने महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. संतापाची धग अगदी दिल्लीपर्यंत पोहोचली आहे. कोपर्डीत जे काही घडलं ते भयानक, संतापजनक आणि प्रचंड चीड येणारंच आहे. कोणत्याही जाती-धर्म-पंथाच्या माणसांनी धिक्कार करावा असंच ते कृत्य आहे. या अशा प्रकरणात ‘जात’ नावाचा प्रकार कुठे येईल, याची कोणी कल्पनाही करू शकत नाही; पण पुरोगामी महाराष्ट्रात हे घडतं आहे. बलात्कार करणार्‍यांची आणि जिच्यावर अत्याचार झाला तिची जात शोधून त्या अंगाने चर्चा घडविण्याचा, प्रकरणाला जातीय वळण देण्याचा प्रकार होतो आहे. हे असं करणार्‍यांना नागडं करून फोकाने झोडपून काढावं, एवढी ही विकृत मानसिकता आहे. महाराष्ट्र पुरोगामी आहे, ही अंधश्रद्धा आहे. या एका विचारवंतांच्या प्रसिद्ध वाक्याची यानिमित्ताने आठवण झाली. २१ व्या शतकात आता कुठे जातपात उरली हो, असे आपल्यापैकी अनेकजण भाबडेपणाने सांगत असले तरी ‘जात’ नावाचा प्रकार आपण किती घट्ट कवटाळून बसलो आहोत, याचे विदारक दर्शनही या प्रकरणाच्या निमित्ताने पुन्हा एकदा घडले. या प्रकरणातील आरोपी दलित असल्याने पुरोगाम्यांनी, माध्यमांनी, राजकारण्यांनी दोन-तीन दिवस या प्रकरणाकडे कानाडोळा केला, या आशयाच्या सोशल मीडियावरील चर्चेने या प्रकरणाला सुरुवात झाली. बघता बघता त्या चर्चेला नको ते वळण लागलं. दलित समाज लाडावून गेला आहे. त्यांचा अँट्रॉसिटी अँक्ट काढून घेतला पाहिजे. येथपर्यंत ही चर्चा भरकटली. खरंतर कुठल्याही दलित संघटनेने वा समूहाने या घटनेचं वा आरोपीचं सर्मथन केलं नव्हतं. उलट कोपर्डीतील दलित समाज व इतर ठिकाणाहूनही आरोपींवर अत्यंत कठोर कारवाई झाली पाहिजे, अशीच मागणी झाली आहे. असं असतानाही वातावरण चिघळविण्यासाठी हेतुपूर्वक जातीय रंग उधळण्यात आले. दलित समाजाबद्दल पूर्वग्रह बाळगून असलेल्या आणि त्यांचा दुस्वास करत असलेल्या मंडळींकडून ही चर्चा घडविण्यात आली. यानिमित्ताने मराठा समाजाला चिथावणी देऊन दलितांवर कुदविण्याचा डाव होता. त्यासाठीच बलात्कार्‍यांची व अत्याचारित मुलीची जात कुठली हे जाणीवपूर्वक पसरविण्यात आलं. या अशा प्रकरणातही माणसं जात विसरत नाही, याचं नवल वाटतं. कोण कुठल्या जातीत जन्माला यावं, कोणत्या घरात जन्माला यावं, यात माणसाचा कुठलाही वैयक्तिक पराक्रम नसताना एका जीवशास्त्रीय अपघाताचा, योगायोगाचा माणसं आयुष्यभर अभिमान कुरवाळत बसतात. जातिधर्माच्या दुरभिमानातून कुठलं प्रकरण आपण द्वेषाच्या पेरणीसाठी वापरत आहोत, याचं भानही त्यांना उरत नाही. असाच प्रकार यावेळीही झाला. नेते, माध्यमं व पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांकडे अंगुलिनिर्देश करून मराठय़ांच्या एका पोरीवर अत्याचार झाला असताना हे आता कुठे गेलेत, यांची तोंडं आता बंद का, असे भडकविणारे प्रश्न विचारण्यात आलेत. 

काही अंशी हे खरं आहे की, कोणत्या प्रकरणात कोण गुंतलं आहे, हे पाहून प्रतिक्रिया काय आणि कशा द्यायच्यात हे आपल्याकडे ठरविलं जातं. विशेषत: पुरोगामी मंडळी यात आघाडीवर असतात. मागे मुंबईच्या आझाद मैदानात रझा अकादमीच्या मोर्चादरम्यान जो हैदोस घालण्यात आला तेव्हा अनेकांनी आपली तोंडं बंद ठेवली होती. ज्या वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींची छेडछाड झाली होती. मारहाण झाली होती, त्यांनीही तोंडावर पट्टी लावून घेतली होती. कोपर्डीच्या प्रकरणात मात्र काही स्वनामधन्य माध्यमवीर सोडलेत, तर असं काही झालं नाही. घटनेची गंभीरता कळताच केवळ मराठा समाजच नाही, तर वेगवेगळे समाजघटक रस्त्यावर उतरून संताप व्यक्त करत आहेत. दलित समाजातील सुजाण मंडळीही बलात्काराचे कृत्य करणार्‍या त्या नराधमांना फाशीच दिली पाहिजे, हे ताकदीने सांगत आहेत. बलात्कारी प्रवृत्तीचं कुठल्याही पद्धतीने सर्मथन करता येणार नाही, हाच सूर उमटत आहे. मराठा समाजातल्या सर्व प्रमुख संघटनांनी आग भडकावू इच्छिणार्‍यांच्या कारस्थानाला बळी न पडता अतिशय संयमितपणे आपल्या संतापाचे प्रदर्शन घडविले. या प्रकरणाला वेगळं वळण लागणार नाही, याची त्यांनी काळजी घेतली. खरंतर बलात्कार्‍याला जात नसतेच. कुठल्याही समाजातला, धर्मातला लिंगपिसाट हे असे प्रकार करतो. परवा या प्रकरणानंतर अशा प्रकरणात जातपात आणणार्‍यांना लेखिका, पत्रकार प्रतिमा जोशींनी सात्त्विक संतापाने जे प्रश्न विचारलेत ते अंतर्मुख करणारे आहेत. ‘…भडव्यांनो, कसल्या जातिपाती काढताय. आयाबहिणींच्या योनीत घुसायला कसला लागतोय जातधर्म? तुम्ही कधी तरी केलाय का निषेध चुरगळल्या जाणार्‍या कोणाच्याही बाजूने? कधी उतरलात रस्त्यावर? बाईला माणूसपण मानत नाही तुम्ही…वय पाहत नाही, कर्तृत्व पाहत नाही, काही पाहत नाही…थूत तुमची… ‘ त्यांचा संताप रास्त आहे. बरोबर आहे. कुठल्याही जातिधर्मातला पुरुष वखवखलेल्या जनावरासारखाच बाईकडे पाहतो. संधी मिळताच तो झडप घालतो. म्हणूनच निषेध, संताप हा त्या जनावरी वृत्तीचा हवा; कुठल्या समाजाचा नाही. हे शहाणपण या प्रकरणाच्या निमित्ताने मिळालं तरी खूप झालं. बाकी या अशा बलात्कार प्रकरणांचा जरा वेगळ्या अंगानेही विचार व्हायला हवा. देशात, राज्यात कुठलंही बलात्काराचं प्रकरण घडलं की काही काळ प्रचंड संतापाचा भडका उडतो. माणसं संतापतात. रस्त्यावर उतरतात. आंदोलन करतात. बलात्कार्‍यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करतात. काही काळानंतर सारं थंडावतं. पुन्हा नवीन प्रकरण घडलं की हाच घटनाक्रम रिपिट होतो. या अशा अनेक प्रकरणांमुळे सरकारने वेळोवेळी कायद्यात बदल केले आहेत. कठोर शिक्षेची तरतूद केली आहे. तरी अशी प्रकरणे नित्यनेमाने का घडतात, याचा जरा भावना बाजूला ठेवून विचार केला पाहिजे. आपल्याकडील पारंपरिक बंदिस्त समाजव्यवस्था, लहान असतानापासून स्त्रीदेहाबद्दल निर्माण करण्यात आलेलं विकृत कुतूहल. सिनेमा, जाहिराती आणि इतर माध्यमातून स्त्रीकडे भोगवस्तू म्हणून पाहण्याची मिळालेली दृष्टी, लैंगिक शिक्षणाचा अभाव, लैंगिक अतृप्ती, पुरुषप्रधान व्यवस्थेतून स्त्रीबाबत निर्माण झालेली मालकी हक्काची भावना… अशा अनेक कारणांमुळे बलात्काराची प्रकरणं घडतात. परदेशात याविषयात शास्त्रीय अभ्यास करून माणसं अशी का वागतात, हे शोधून त्यावर उपाय काढण्याचा प्रय▪होतोय. आपल्याकडेही असे काही प्रय▪झालेत तर अशा प्रकरणांपासून काही शिकलो, असे म्हणता येईल. 

About the author

admin

Leave a Comment